हुकमी एक्का अन् कोल्हापूरची लोकसभा; सतेज पाटलांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 02:51 PM2024-03-03T14:51:14+5:302024-03-03T14:53:32+5:30

कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.

congress leader Satej Patil reaction on Kolhapur Lok Sabha seat | हुकमी एक्का अन् कोल्हापूरची लोकसभा; सतेज पाटलांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

हुकमी एक्का अन् कोल्हापूरची लोकसभा; सतेज पाटलांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

Kolhapur Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणीसाठी सुरू केली आहे. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक यंदा चुरशीची ठरणार आहे. कारण कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा संधी दिली जाते की नवा पर्याय निवडला जातो, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. अशातच पाटील यांनी काल झालेल्या एका कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.

"कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे पत्ते व्यवस्थित पडतील. पत्ते पिसलेले आहेत आणि त्यातील ‘हुकमी एक्का’ आमच्याकडे आहे, योग्यवेळी आघाडीचा निर्णय होईल," असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पुढील काही दिवसांत शाहू महाराजांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उमेदवारीबद्दल शाहू महाराजांची भूमिका काय?

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. "तुम्ही ज्या ब्रेकिंग न्यूजची वाट पहात आहात ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल. तर ती मोठी जबाबदारी आहे. तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर मी कामासाठी नेहमी उपलब्ध आहे. ही ब्रेकिंग न्यूज ऐशआराम करण्यासाठी नसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची असेल. आता ही प्रश्न सोडवले जात आहेत. परंतु ते अधिक गतीने आणि व्यापक पद्धतीने सोडवण्यासाठी तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन लागणार आहे. तुम्ही म्हणता तशी बातमी आलीच तर आपल्या आणखी एक, दोन बैठकाही होतील. मी तुमच्याशी संवाद साधेन. एकाचवेळी सर्व प्रश्न सुटणार नाहीत. परंतु त्यासाठीचा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवावा लागेल," असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २० फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथं शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात होती. या भेटीनंतर शरद पवार यांनी लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांबाबत भाष्य करत शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असं म्हटलं होतं.

Web Title: congress leader Satej Patil reaction on Kolhapur Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.