Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटील-क्षीरसागर गल्लीत भेटले...जुन्या आठवणीत रमले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:51 IST2026-01-14T13:48:00+5:302026-01-14T13:51:34+5:30
फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल

छाया: नसीर अत्तार
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक ७...बजाप माजगावकर तालीमचा परिसर...वेळ दुपारी सव्वाएकची. एका गल्लीत अचानक काँग्रेस व शिंदेसेनेच्या पदयात्रा आमनेसामने आल्या. दोन्हीकडील कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत कुणीच कुणाकडे पाहायला तयार नव्हते.
मात्र, याच गर्दीतील दोन चेहरे आवर्जून समोरासमोर आले, त्यांनी हस्तांदोलन केलं अन् आपण पूर्वीचे मित्र आहोत, याची आठवणही एकमेकांना करून दिली. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील व शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भेटीचा हा क्षण अनेकांच्या मोबाइलमध्ये कैद झाला अन् सोशल मीडियावरही तो तुफान व्हायरल झाला.
मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सतेज पाटील यांची प्रभाग क्रमांक ७ मध्ये पदयात्रा सुरू होती. त्याचवेळी आमदार क्षीरसागर यांचीही याच प्रभागात रॅली निघाली असताना या दोघांची बजाप माजगावकर तालीम परिसरातील एका रुंद गल्लीत भेट झाली. सतेज पाटील पदयात्रेत दिसताच आमदार क्षीरसागर यांनी जवळ जात हे आमचे पूर्वीचे मित्र म्हणत त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
यावर सतेज पाटील यांनीही त्यांच्या या मैत्रीच्या आठवणीला दाद देत त्यांच्याशी संवाद साधला. विशेष म्हणजे, अगदी दोन-तीन मिनिटांचाच हा संवाद; पण दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही काही क्षण नेत्यांच्या आठवणीच्या संवादात सुखावून गेले.