Kolhapur Municipal Election 2026: उद्धवसेनेसोबत साथ.. काँग्रेस कोणते थांबविणार 'सात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:15 IST2025-12-26T12:14:33+5:302025-12-26T12:15:24+5:30
जिंकण्याची पेरणी...

Kolhapur Municipal Election 2026: उद्धवसेनेसोबत साथ.. काँग्रेस कोणते थांबविणार 'सात'
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने उद्धवसेनेबरोबर आघाडी करत महाविकास आघाडीची एकत्रित मूठ बांधण्याच्या प्रक्रियेत एक पदर जोडला खरा; मात्र, उद्धवसेनेला दिल्या जाणाऱ्या जागा पाहता तेथे काँग्रेसच्या उमेदवारांनी वर्षभरापासून तयारी केली आहे. त्यामुळे या जागांवर काँग्रेसकडून लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना थांबावे लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धवसेनेचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला असून यामध्ये उद्धवसेनेला १२ जागा देण्यात येणार आहेत. यातील सात जागांवर या दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. ज्या जागांवर एकमत झाले आहे त्या जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी खूप महिन्यांपूर्वी तयारी सुरू केली आहे.
या पाच प्रभागांमध्ये काँग्रेसचे सुरुवातीपासून प्राबल्य राहिले आहे. येथील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची एक फेरी पूर्णही केली आहे. मात्र, आता हक्काच्या जागा उद्धवसेनेला जाणार असल्याने इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. उद्धवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी हेदेखील प्रभाग क्रमांक पाचमधून इच्छुक आहेत. त्यांनीही फिल्डिंग लावली आहे.
जिंकण्याची पेरणी...
महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरे जाताना घटकपक्षांनाही न्याय देण्याची भूमिका आमदार सतेज पाटील यांनी घेतली असली तरी ज्या जागांवर हमखास काँग्रेस गुलाल लावू शकते, अशा जागा उद्धवसेनेने घेतल्याने इच्छुक उमेदवारांची चलबिचल वाढली आहे. मतदारसंघात काम आम्ही करायचे, जिंकण्यायोग्य पेरणी आम्ही करायची अन् ऐनवेळी संधी दुसऱ्यांनी घ्यायची, या शब्दांत इच्छुक नाराजी व्यक्त करत आहेत.
एक जागा अडसर
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार हे त्यांच्या पुतण्यासाठी अडून बसले आहेत. मात्र, या प्रभागात काँग्रेसच्या उमेदवाराने गेल्या कित्येक वर्षांपासून मशागत केली आहे. त्यामुळे काँग्रेस ही जागा राष्ट्रवादीला देण्यास तयार नाही. या एकाच जागेवरून राष्ट्रवादी महाविकास आघाडीत येण्यास अडसर ठरला आहे.
उद्धवसेनेला दिल्या जाणाऱ्या संभाव्य जागा
प्रभाग क्रमांक १५ : प्रतिज्ञा उत्तुरे.
प्रभाग क्रमांक १४ : छाया पाटील.
प्रभाग क्रमांक ११ : सचिन मांगले.
प्रभाग क्रमांक ७ : राजेंद्र जाधव व उद्धवसेनेचे कार्यकर्ते सागर साळोखे यांच्या पत्नी सुप्रिया साळोखे.
प्रभाग क्रमांक १० : राहुल इंगवले