आवाजाचे उल्लंघन केले; कोल्हापूर परिक्षेत्रातील किती मंडळांवर दाखल झाले खटले, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 19:14 IST2025-09-05T19:12:55+5:302025-09-05T19:14:37+5:30
१७ हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

आवाजाचे उल्लंघन केले; कोल्हापूर परिक्षेत्रातील किती मंडळांवर दाखल झाले खटले, वाचा सविस्तर
कोल्हापूर : गणेशोत्सव काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून ध्वनियंत्रणांचा आवाज वाढवणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रातील ७१६ मंडळांवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीतही मंडळांच्या आवाजावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. तसेच उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिक्षेत्रातील १७ हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाया आणि खबरदारीच्या उपायांबद्दल फुलारी म्हणाले, ‘राज्यातील एकूण गणेश मंडळांपैकी सुमारे ३० ते ३५ टक्के मंडळे कोल्हापूर परिक्षेत्रात आहेत. त्यामुळे या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एक ते दीड महिना आधीच पोलिसांनी मंडळांशी समन्वय साधून लेसरबंदीची माहिती दिली होती.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाज मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही आगमन मिरवणूक आणि गणेशोत्सव काळात काही मंडळांनी आवाज वाढवून सूचनांचे उल्लंघन केले. अशा ७१६ मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.’
परिक्षेत्रात नऊ हजार पोलिसांसह पाच हजार २५० होमगार्ड आणि शीघ्रकृती दलाच्या पाच तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात असतील. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती फुलारी यांनी दिली. यावेळी पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.
१७ हजार सराईतांवर कारवाया
जिल्हा - गुन्हेगार
कोल्हापूर - १९८२
सांगली - ६७८२
सातारा - २७०५
सोलापूर ग्रामीण - ३५४९
पुणे ग्रामीण - २३१९
३० गुन्हेगारांवर ‘मोक्कां’तर्गत कारवाई
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रातील ३० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यात वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३, इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १० आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सात गुन्हेगारांवर कारवाई झाली.
अनंत चतुर्दशीनंतर ईद-ए-मिलादच्या मिरवणुका
शुक्रवारी ईद-ए-मिलाद असले तरी याच्या मिरवणुका अनंत चतुर्दशीनंतर घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानुसार परिक्षेत्रात सात सप्टेंबरनंतर या मिरवणुकांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आयजी फुलारी यांनी दिली.
साताऱ्यातील मंडळाला दंड
आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल सातारा येथील एका गणेश मंडळाला जिल्हा न्यायालयाने १० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. दोषी मंडळांना मोठा दंड व्हावा, यासाठी पोलिस प्रयत्न करतील, अशी माहिती फुलारी यांनी दिली.