Kolhapur: अकॅडमीतील तोडफोडप्रकरणी माजी आमदाराच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:42 IST2025-06-19T13:41:55+5:302025-06-19T13:42:13+5:30
विद्यार्थ्याच्या आत्महत्या घटनेनंतर संतप्त तरुणांच्या जमावाने केली होती तोडफोड

Kolhapur: अकॅडमीतील तोडफोडप्रकरणी माजी आमदाराच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी : येथील यश यादव या विद्यार्थ्याच्या आत्महत्या घटनेनंतर संतप्त तरुणांच्या जमावाने श्रद्धा अकॅडमीच्या मुख्य इमारतीवर केलेल्या दगडफेकप्रकरणी एका माजी आमदाराच्या पुत्रासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आदित्य मारुती दुंडगे यांनी फिर्याद दिली आहे.
राहुल राजीव आवळे, इंद्रजीत घोरपडे, संतोष आवळे, जमिल मोमीन, आर्यन लोखंडे, वैभव पवते, पवन तडाखे, सतीश आवळे, अजित भोरे, वसीम कलावंत, महेश केंगार, किशोर आवळे, दस्तगीर बागवान, अमर आळंदे, सचिन कुंभार, (सर्व रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यांच्यावर भादंवि कलम ३२४ (४), १८९ (२), १८९ (४), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(क), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश याने हॉस्टेलमधे मंगळवारी (दि.१७) सकाळी बाथरूममध्ये टायने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा निषेध नोंदवत सायंकाळी संतप्त युवकांनी जमावबंदी आदेश असताना रिक्रेशन हॉल परिसरातील श्रद्धा अकॅडमीच्या इमारतीवर जोरदार दगडफेक करत इमारतीच्या काचा फोडण्यासह फुलझाडांचे नुकसान, तसेच अकॅडमीचे डिजिटल बोर्ड फाडून अंदाजे ४० हजार रुपयाचे नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.