Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपकडून अधिकृतचा फोन; उमेदवारांच्या हालचाली गतिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:56 IST2025-12-26T17:54:45+5:302025-12-26T17:56:59+5:30
फोन न आलेल्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका, बंडखोरी रोखण्याचे आव्हान

Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपकडून अधिकृतचा फोन; उमेदवारांच्या हालचाली गतिमान
अतुल आंबी
इचलकरंजी : भाजपकडून अधिकृत उमेदवारी निश्चित झालेल्यांच्या यादीवर मुंबईत शिक्कामोर्तब झाल्यानंतर आवाडे-हाळवणकर यांच्या माध्यमातून संबंधितांना कामाला लागा, असे फोन आले. त्यामुळे त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या. दरम्यान, फोन न आलेल्या इच्छुक उमेदवारांच्यात चुळबुळ चालू झाली असून, काहींच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. त्यातून बंडखोरी अथवा फुटाफुटीच्या राजकारणाला गती प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपकडे उमेदवारी मागणीसाठी भाऊगर्दी झाली. ६५ जागांसाठी तब्बल ४२९ जणांनी उमेदवारी मागितली. त्यामुळे त्यातून शिेंदेसेनेच्या जागा वगळता उर्वरित जागांवर उमेदवार निश्चित करताना पक्षश्रेष्ठींना घाम फुटला. स्थानिक पातळीवरील बैठकांसह जिल्हा पातळीवरील बैठका झाल्या. परंतु एकमत झाले नाही. अखेर मुंबईत जाऊन पक्षाचा अधिकृत सर्व्हे, स्थानिक सर्व्हे आणि निश्चित नावांची यादी यावर चर्चा होऊन अखेर ९५ टक्के जागांवर एकमताने शिक्कामोर्तब झाला.
या निश्चित उमेदवारांना फोनवरून कागदपत्रांची जुळवाजुळव करा आणि भागात कामाला लागा, अशा सूचना देण्यात आल्या. ही माहिती अन्य इच्छुकांना समजताच त्यांच्यात चुळबुळ सुरू झाली. इतर प्रभागातील एकमेकांच्या संपर्कातील उमेदवारांना फोन करून तुम्हाला फोन आला होता काय? पुढे काय करायचं, याबाबत बोलणी सुरू झाली. काही प्रभागांतील इच्छुक एकत्र येत रात्री उशिरापर्यंत चर्चेच्या बैठका रंगल्या.
त्यावेळी काहींनी राग व्यक्त करत निवडणुकीला सामोरे जाणारच, अशी भूमिका मांडली. काहीजणांनी एकत्रित येऊन चौघांची मोट बांधता येईल का, याचीही चर्चा केली. त्यामुळे उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर फुटाफुटी व बंडखोरीच्या घडामोडींना गती प्राप्त होणार की, बंडखोरांना थंड करण्यात पक्षश्रेष्ठी यश मिळविणार, याकडे लक्ष लागले आहे.
सर्व्हेतील स्कोरवर नावे निश्चित
प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर यांच्याकडून दिलेल्या यादीतील ज्या उमेदवारांचा सर्व्हे स्कोर (रेषो) आणि मुख्यमंत्री स्तरावर झालेला सर्व्हे यातील बहुतांशी जागांवर समानता आढळली. त्यामुळे ज्यांचा स्कोर ९० टक्क्यांच्यावर आहे, त्यांची नावे एकमताने निश्चित झाली. उर्वरित ५ टक्क्यांचा लवकरच निकाल लागेल. त्यानंतर ती यादी निश्चित होईल.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
ज्या उमेदवारांना फोन गेले, ते कामाला लागले. काहींनी फटाके वाजवले, काहींनी स्टेटस् ठेवला. त्यामुळे अन्य इच्छुकांच्या घडामोडींना वेग आला. यातून बंडखोरी व फुटाफुटीची शक्यता निर्माण होत असल्याने त्याला रोखण्याचे पक्षश्रेष्ठींसमोर आव्हान आहे. त्यासाठी कोणाला कोणते आश्वासन दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.