Kolhapur: इचलकरंजीत युवकास अमानुष मारहाण, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:02 IST2024-06-28T13:01:48+5:302024-06-28T13:02:06+5:30
पाळीव डुकराला मारण्याच्या कारणावरून केली मारहाण

Kolhapur: इचलकरंजीत युवकास अमानुष मारहाण, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य; व्हिडीओ व्हायरल
इचलकरंजी : चारजणांनी एका युवकाचे पाय आणि हात पकडले आणि अर्धनग्न अवस्थेत असलेला एक रेकॉर्डवरील तरुण त्या युवकास काठीने पायाच्या तळव्यावर आणि नंतर मांडीवर अमानुषपणे मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. व्हिडीओ बघताना नागरिक संताप व्यक्त करत होते. या व्हिडीओवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.
पाळीव डुकराला मारण्याच्या कारणावरून एका तरुणाने एका युवकास बोलावून घेतले. त्याला त्या डुकरासंदर्भात जाब विचारला. त्याने त्याची समर्पक उत्तरे न दिल्याने त्या तरुणाने आणखी चार युवकांना बोलावून घेतले. त्या युवकाचे हात आणि पाय पकडण्यास सांगितले. मानेवर पाय ठेवला. त्यानंतर प्रथम लोखंडी पाइपच्या साहाय्याने त्या तरुणाने युवकाच्या पायाच्या तळव्यावर बेदम मारहाण केली. त्यावेळी तो युवक मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करत, किंचाळत होता.
त्यानंतर पुन्हा त्याने दोन युवकांना पाय आणि दोन युवकांना हात धरावयास लावले. हातात लोखंडी पाइप घेऊन फक्त चड्डी परिधान केलेल्या अर्धनग्न तरुणाने त्या युवकाच्या मांडीवर पुन्हा अमानुष मारहाण केली. मार खात असलेला युवक आपल्याला सोडण्यासाठी गयावया करत होता, परंतु याची कोणती तमा न बाळगता त्याने मारहाण सुरूच ठेवली.
त्या तरुणाने मारहाण करतानाचा व्हिडीओ दोघांना चित्रित करण्यास सांगितले आणि तो व्हिडीओ स्वतःच व्हायरल केला. पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावरून संपूर्ण शहरभर पसरला. त्या व्हिडीओची दिवसभर चर्चा सुरू होती. मारहाण करणाऱ्या तरुणाला आणि मार खाल्लेल्या युवकास शहापूर पोलिसांनी बोलावून घेतल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.