Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेना युती दाबून, सगळ्यांना सोसणार नाही - विनय कोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:45 IST2025-12-25T11:44:29+5:302025-12-25T11:45:26+5:30
निष्ठा, विचार आहे की नाही; कोल्हापूरच्या राजकारणाला दिशा देण्यासाठी रिंगणात

Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेना युती दाबून, सगळ्यांना सोसणार नाही - विनय कोरे
कोल्हापूर : भाजप आणि शिंदेसेनेतील युती ही दाबून चालली आहे. पण, ते सगळ्यांना सोसणारी नाही. इथे कोणीही उठून कुठल्याही पक्षात निघाला आहे. त्यामुळे जनतेचा नगरसेवकांकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहून आपण कोल्हापूर महापालिकेसाठी काही उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी सांगितले.
कोरे म्हणाले, जेव्हा महाडिक, बंटी पाटील एकत्र होते तेव्हा आम्ही आणि मुश्रीफ एकत्र आलो. तेव्हा पक्षीय राजकारण इथे नव्हते. निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संघटना बांधायची आणि महापालिका चालवायची असे सुरू होते. याची महाराष्ट्रात विचित्र चर्चा सुरू होती. दोन, तीन महिन्यांचे महापौर केले जात होते. तेव्हा आम्ही त्यात बदल घडवण्यात यशस्वी झालो.
सई खराडे, उदय साळोखे यांना महापौर केले. तेव्हा रस्त्यांचा ५०० कोटींचा प्रकल्प आम्ही आणला. त्यावेळी महापालिका आणि शासनात करार होत नव्हता. तो आम्ही करून घेतला. थेट पाइपलाइनचे पाणी कळंब्यात आणावे अशी माझी योजना होती. त्यामुळे ग्रॅव्हिटीने निम्म्या कोल्हापूरला पाणी मिळाले असते.
निष्ठा, विचार आहे की नाही
गेल्या काही महिन्यांतील परिस्थिती पाहता कोल्हापूरमध्ये पक्षनिष्ठा, विचार शिल्लक आहे की नाही असे वाटते. यातूनही काही चांगली माणसं पुढं आणता येतील का, याचा हा एक प्रयत्न आहे असे कोरे म्हणाले.
भाजपची डाेकेदुखी
कोरे म्हणाले, आम्ही भाजपचे नैसर्गिक मित्र आहोत. काही नगरपालिका आम्ही एकत्र लढवल्या आहेत. त्यामुळे आज इच्छुकांशी चर्चा झाली की भाजपच्या नेत्यांशी बोलू. यश मिळेल की नाही माहिती नाही. त्यांची डोकेदुखी वाढवायची नाही. पण, यातून काही चांगले निष्पन्न करण्यासाठी प्रयत्न आहे.
‘जनसुराज्य’च्या मुलाखतींसाठी ५४ जणांची हजेरी
कोल्हापूर : शिवाजी पार्कच्या एका हॉटेलमध्ये आयोजित कोल्हापूर महापालिकेसाठी ‘जनसुराज्य’ने घेतलेल्या मुलाखतींसाठी ५४ जणांची उपस्थिती होती. तसेच ज्यांना उघड कोरे यांना भेटायचे नव्हते अशांनीही कोरे यांची विविध ठिकाणी भेट घेतल्याचे सांगण्यात आले.
दुपारपासून आमदार अशोकराव माने, समित कदम, विजयसिंह कदम यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुकांना जनसुराज्यकडून फॉर्म देण्यात आले होते. त्यामध्ये माहिती भरून घेण्यात आली होती. सुमारे तीन तास मुलाखती चालल्या. यावेळी माजी महापौर उदय साळोखे, रमेश पुरेकर, आण्णा बराले, कमलाकर भोपळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
भाजप, शिंदेसेनेच्या काहींची उपस्थिती
यावेळी गेल्या दोन महिन्यांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केलेले रमेश पुरेकर हे या ठिकाणी धावपळीत होते. भाजपचे मंडल अध्यक्ष रविकिरण गवळी हेदेखील या ठिकाणी अर्ज भरून मुलाखतीसाठी उपस्थित होते. प्रसन्न शिंदे, वीरेंद्र मोहिते, प्रकाश घाटगे यांच्यासह अनेक इच्छुकांनी येथे गर्दी केली होती.