Kolhapur Election 2026: भाजपच्या १२ बंडखोरांची डोकेदुखी कायम; प्रभाग अन् कोणता झेंडा घेतला हाती.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:52 IST2026-01-06T18:50:19+5:302026-01-06T18:52:32+5:30
तासाभारात कमळ सोडले, हात घेतला हातात

Kolhapur Election 2026: भाजपच्या १२ बंडखोरांची डोकेदुखी कायम; प्रभाग अन् कोणता झेंडा घेतला हाती.. वाचा
कोल्हापूर : शिस्तबद्ध पक्ष म्हणून अजूनही आपली ओळख सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या १२ कार्यकर्त्यांना थांबविणे शक्य झाले नाही. उर्वरित तिघांना भाजपनेच जागांच्या तडजोडीसाठी आणि एकाच प्रभागात एकच निवडणूक चिन्ह राहावे यासाठी अन्य पक्षांत पाठविले आहे. तर ५ जणांनी जनसुराज्यचा आधार घेतला असून, ६ जण अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर १ उमेदवार काँग्रेसमधून लढत आहे.
जनसुराज्यमध्ये गेलेले आणि उमेदवारी मिळविलेले तसेच अपक्ष रिंगणात उतरलेले बहुतांशी उमेदवार हे भाजपचे संघटनात्मक पदाधिकारी होते. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहिले. परंतु महायुतीच्या जागा वाटपात त्यांच्यावर गंडांतर आले आणि त्यांनी तातडीने पर्यायही शोधला. ६ ड मधून राहुल सूर्यकांत घाटगे हे मंडलचे पदाधिकारी यांनी उमेदवारी न मिळाल्याने जनसुराज्यची उमेदवारी मिळविली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधून जनसुराज्यच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा म्हसवेकर यांचे वडील भाजपचे पदाधिकारी होते.
वाचा : काँग्रेसमध्ये एकच बंडखोर, तरी जिवाला घोर
प्रभाग क्रमांक दहामधून शिवाजी पेठ मंडलच्या पदाधिकारी सरिता नितीन हरुगले या अपक्ष म्हणून रिंगणात असून, ११ मधून संतोष सदाशिव माळी आणि याच प्रभागातून भाजपचे वीरेंद्र विलास मोहिते हेदेखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. प्रभाग ११ मधून भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी विजय सुभाष दरवान हे उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवत आहेत. १२ ब मधून मंडल पदाधिकारी रश्मी श्रीनिवासराव साळोखे या अखिल भारतीय हिंदू महासभेतर्फे रिंगणात आहेत.
वाचा: शिंदेसेनेकडून रस्त्याच्या कामात दहा कोटींचा ढपला, रविकिरण इंगवले यांचा आरोप
भाजपचे पदाधिकारी अतुल चव्हाण यांच्या पत्नी प्रीती १२ क मधून जनसुराज्यकडून निवडणूक लढवत आहेत. मंडल पदाधिकारी असलेल्या स्वाती संतोष कदम १३ अ मधून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर राजारामपुरी उत्तरच्या मंडल अध्यक्ष रविकिरण गवळी यांच्या पत्नी मधुरिमा या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. १४ ब मधून भाजपचे पदाधिकारी विशाल शिराळकर यांच्या पत्नी पूजा या जनसुराज्यकडून रिंगणात असून, १८ अ मधूनही स्वाती संतोष कदम या रिंगणात आहेत.
तासाभारात कमळ सोडले, हात घेतला हातात
गेल्या दोन वर्षांपासून महेश पाटील हे भाजपकडून महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी करत होते. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांनी त्यादृष्टीने भाजप नेत्यांसह आपल्या पत्नीची छायाचित्रे असलेले फलकही लावले होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि तातडीने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या पत्नी प्रणोती हे काँग्रेसच्या उमेदवार बनल्या.
अशीही खेळी
८१ पैकी ७५ ठिकाणी काँग्रेसने हात चिन्हावर उमेदवार उभे केल्याने आणि महायुतीत तीन पक्ष असल्याने चिन्हांचा घोळ होऊ नये यासाठी पाच ते सहा प्रभागांमध्ये महायुतीनेही एक चिन्ह ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कसबा बावडा येथील प्रभाग १ मध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना धनुष्यबाणावर आणि जुने कार्यकर्ते रवींद्र मुतगी यांना घड्याळ चिन्हावर लढविण्यास भाजपने मान्यता दिली.