भाजप हाच देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:38 IST2026-01-09T12:37:55+5:302026-01-09T12:38:58+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपच्या तालावर नाचतात

भाजप हाच देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
इचलकरंजी : भाजप हाच सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचतात. भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते कैद्यासारखे आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, निवडणुकीमध्ये उमेदवारांची पळवापळवी, दबावतंत्राचा वापर, दमदाटी यावरून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी चिंता वाटत आहे. निवडणुकीमध्ये पैसे वाटले जातात आणि ते घेणारेही आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे.
निवडणुकीत पैसा घेतला नसता, तर अशी रस्त्यांची दुरवस्था झाली नसती. सात-सात दिवस पाणी येत नाही. नदी प्रदूषित झाली आहे. त्याला जबाबदार आपणच आहोत. यावेळी सिद्धार्थ कांबळे, संदीप देसाई, सुदर्शन कदम, प्रकाश सुतार, वसंत कोरवी, यशवंत भंडारे, सोमनाथ साळुंखे, जनार्दन गायकवाड, पी.आर. कांबळे, रावसाहेब निर्मळे, संदीप कांबळे, वैशाली कांबळे आदी उपस्थित होते.
पाटीलकी शाहीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो
इचलकरंजी येथील स्थानिक शिव-शाहू आघाडीतून पाटीलकीशाहीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजी शहराला सहा दिवसांतून एकवेळ पाणी मिळते. वस्त्रनगरी असूनही त्यामानाने आवश्यक स्थानिक स्किल कामगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले नाही, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.