Kolhapur Municipal Election 2026: ‘करेक्ट’ कार्यक्रमावरून जुंपली, महायुती-काँग्रेस भिडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:46 IST2026-01-20T12:45:30+5:302026-01-20T12:46:08+5:30
..तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम केला असता - सतेज पाटील

Kolhapur Municipal Election 2026: ‘करेक्ट’ कार्यक्रमावरून जुंपली, महायुती-काँग्रेस भिडली
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका जिंकल्यानंतर महायुतीकडून कॉंग्रेसला मोठ्या फलकाद्वारे डिवचण्यात आले आहे. ‘धन्यवाद कोल्हापूरकर, कॉंग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलात’ असा मजकूर आणि महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे असलेले मोठमोठे फलक कोल्हापूरमध्ये उभारण्यात आले आहेत. यावर कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही वेगवेगळे लढला असता तर कोल्हापूरच्या जनतेने तुमचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम केला असता असे प्रत्युत्तर सोमवारी दिले आहे.
गतवेळची विधानसभा, चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक आणि नंतरची लोकसभा या तीनही निवडणूका कॉंग्रेसने सलग भाजप, शिंदेसेनेला चितपट केले होते. लोकसभेला देखील शाहू छत्रपती यांच्या माध्यमातून कॉंग्रेसने मास्टर स्ट्रोक मारत ही जागा खेचून घेतली.
मात्र त्यानंतर कोल्हापूरच्या दोन्ही विधानसभेच्या जागा भाजप, शिंदेसेनेने पटकावल्या. त्यानंतर महायुतीसाठी कोल्हापूर महापालिका महत्त्वाची होती. त्यामध्ये यश मिळवल्यानंतर मात्र ‘मनात तेच मनपात’ या फलकांच्याही पुढे जाऊन महायुतीने कॉंग्रेसला करेक्ट कार्यक्रम झाल्याचे फलक लावून डिवचले आहे.
आम्ही कोणताही चुकीचा फलक लावलेला नाही. कोल्हापूरच्या जनतेने महायुतीला निर्णायक असे बहुमत दिले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात भाजपला सर्वाधिक जागा पहिल्यांदा मिळाल्या आहेत. त्यामुळेच जनतेनेच कॉंग्रेसचा जो करेक्ट कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही एकदा नाही हजारदा कोल्हापूरकरांचे आभार मानू. त्याला कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही. - खासदार धनंजय महाडिक
वेगवेगळे लढला असता तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम केला असता, सतेज पाटील यांचा पलटवार
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले, ते वेगवेगळे लढले असते तर कोल्हापूरकरांनी महायुतीचाच करेक्ट कार्यक्रम केला असता, या शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महायुतीच्या पोस्टरबाजीवर पलटवार केला.
‘धन्यवाद कोल्हापूरकर.. काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलात!’ अशी बॅनरबाजी महायुतीने शहरभर करून काँग्रेसला डिवचले आहे. त्यावर आमदार पाटील यांनी “वेगळे लढला असता तर तुमचाच कार्यक्रम केला असता,” असे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “महायुतीने वेगवेगळे लढायला हवे होते. तुमची एवढी ताकद होती तर वेगवेगळे का लढला नाही. आमचे पाच उमेदवार पाचशेच्या आत मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीचा तांत्रिक विजय झाला आहे. जे चांगले आहे त्याला पाठिंबा असेल. मात्र, चुकीचे असेल तर त्यावर लक्ष असेल. आमचा ३५ चा आकडा मोठा आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना तितकं सोपं नाही, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.
अडीच-अडीच वर्षे महापौर करा
कोल्हापुरात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी अडीच-अडीच वर्षे महापौर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.