गणेश विसर्जनासाठी नियुक्त्या, शिक्षकांची थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:58 IST2025-09-03T15:56:50+5:302025-09-03T15:58:12+5:30
विशेष म्हणजे शिक्षकांना विसर्जनस्थळी नियुक्ती असतानाही सर्व शिक्षकांनी यावर बहिष्कार टाकला

गणेश विसर्जनासाठी नियुक्त्या, शिक्षकांची थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका
कोल्हापूर : शिक्षकांना गणेश विसर्जनासह इतर अनेक अशैक्षणिक कामे लावली जात असल्याने त्याविरोधात कोल्हापूर महापालिका शिक्षक, खासगी प्राथमिक शिक्षकांच्यावतीने प्राथमिक शिक्षण समितीसह इतर सहा संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मंगळवारी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली. ॲड. आदित्य रक्ताडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.
शासनाने शिक्षकांना अशी अशैक्षणिक कामे देऊ नका असे बजावले असतानाही शिक्षकांना निवडणुकीसह इतर अनेक अशैक्षणिक कामे लावली जातात. गणेश विसर्जनासाठी महापालिका शिक्षकांच्या मंगळवारी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, शिक्षकांनी ही अशैक्षणिक कामे करण्यास नकार देत थेट महापालिकेविरोधातच याचिका दाखल केली. विशेष म्हणजे मंगळवारी या शिक्षकांना विसर्जनस्थळी नियुक्ती असतानाही सर्व शिक्षकांनी यावर बहिष्कार टाकला. आज बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.