Kolhapur Crime: पत्नीचा दुसरीकडे विवाह करत असल्याने पोलिस ठाण्यातच एकाने घेतले पेटवून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:37 IST2025-03-07T11:36:48+5:302025-03-07T11:37:51+5:30
इचलकरंजी : पत्नीचा दुसरीकडे विवाह करत असल्याचे समजल्याने करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील पतीने इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ...

छाया-उत्तम पाटील
इचलकरंजी : पत्नीचा दुसरीकडे विवाह करत असल्याचे समजल्याने करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील पतीने इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेखर अर्जुन गायकवाड (वय ३१) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला वाचवण्यासाठी पोलिस आणि होमगार्ड यांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर माती, पाणी मारण्यासह पोलिस ठाण्यातील चादर भिजवून त्याला लपेटून आग विझवली. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
करकंब येथील शेखर गायकवाड याचा दुसरा विवाह इचलकरंजीतील एका महिलेशी झाला होता. तिचाही हा दुसरा विवाह होता. पुण्यात झालेल्या ओळखीतून दोघांनी २४ सप्टेंबर २०२४ ला आळंदी येथे देवळात लग्न केले. त्यानंतर काही दिवसांतच शेखर तिला त्रास देऊ लागला. त्यासंबंधित त्याच्यावर दोन ते तीन गुन्हे चाकण पोलिस ठाण्यात दाखल आहेत. वारंवारच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी इचलकरंजीत येऊन राहिली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याच्याकडून नोटरी पद्धतीने सोडपत्र लिहून घेतले.
दरम्यान, तिचा दुसरीकडे विवाह करून देत असल्याची माहिती शेखर याला मिळाली. त्यामुळे तो गुरुवारी इचलकरंजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आला. पोलिसांना त्याने संपूर्ण घटना सांगितली. त्यावेळी पोलिसांनी त्याला धीर धरण्याचा सल्ला देत पत्नीच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी तो मी आत्मदहन करणार, असे म्हणत पोलिस ठाण्याच्या आवारात फिरत होता. पोलिस नातेवाइकांकडून नोटरी केलेली कागदपत्रे तपासणी करत होते. तोपर्यंतच बाहेर त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले.
पेट्रोलमुळे संपूर्ण शरीराचा भडका उडाला. आगीच्या ज्वाळांसह तो मला वाचवा, असे ओरडत पोलिस ठाण्यात घुसला. तेथून पुन्हा दारात आला. पोलिस गाडीच्या दिशेने जाऊ लागला. त्यावेळी पोलिसही त्याच्या मागे धावत होते. त्याला वाचवण्यासाठी पोलिस माती व पाण्याचा मारा करू लागले. एकाने पोलिस ठाण्यातील चादर आणून पाण्यात भिजवून त्याला लपेटली. त्यानंतर आग विझली.
त्यानंतर त्याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलविले. त्यावेळी तो पत्नी व सासरवाडीतील नातेवाइकांना बोलवा. त्याशिवाय उपचार घेणार नाही, असे म्हणत होता. या घटनेत त्याला सुमारे ६० टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चौकट
कॉन्स्टेबलला भाजले
शेखर याने अचानक पेटवून घेतल्यामुळे पोलिसांनी धावपळ करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस कॉन्स्टेबल निलेश कोळी यांच्या हातालाही भाजले आहे. त्याचबरोबर उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांच्यासह सचिन कांबळे, सुमित खुडे, सुनील विभुते, अभिजित परीट, शबाना शिरोळे, वसीम हसुरे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
यापूर्वीही शेखरचा प्रयत्न
शेखर याने १५ दिवसांपूर्वीही इचलकरंजीत येऊन पत्नीच्या दारात दंगा केला. त्यानंतर जवाहरनगर येथील तिच्या मामाच्या दारात दंगा सुरू केला. त्यावेळी मामाने पोलिसांना बोलावले. पोलिस आल्यानंतर शेखर याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे सांगत मला वाचवा म्हणू लागला. त्यामुळे त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते.