भाजपचे जुने कार्यकर्ते सतरंज्या उचलतात, नवे खुर्चीवर बसतात; सतेज पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:53 IST2025-12-31T17:52:23+5:302025-12-31T17:53:05+5:30
हाळवणकर यांची काय अवस्था झाली ते पाहा

भाजपचे जुने कार्यकर्ते सतरंज्या उचलतात, नवे खुर्चीवर बसतात; सतेज पाटील यांचा टोला
इचलकरंजी : इचलकरंजीतील भाजपमध्ये मूळ भाजप व नवा भाजप असा वाद सुरू आहे. मूळ भाजपवाले रस्त्यावर असून, सतरंज्या उचलत आहेत, तर नवा भाजप खुर्चीवर बसला आहे. ज्या माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शहरामध्ये भाजप रूजवला, त्यांची अवस्था आज काय करून ठेवली आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
पाटील म्हणाले, भाजपला जनता कंटाळली आहे. शहरातील मूलभूत प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. भाजपमध्ये कोणत्याही प्रकारे एकवाक्यता नाही. जे सर्वसामान्य लोकांची सेवा करतात, त्यांचा समावेश सर्वसामान्यांमध्ये होतो. सर्वसामान्यांना घेऊनच शिव-शाहू आघाडी काम करीत आहे.
वाचा : इचलकरंजीत एबी फॉर्म वाटपाची खिचडी, भाजपने सात जागा रिक्त ठेवल्या
माजी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षांना शिव-शाहूमध्ये एकत्र घेतले आहे. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, उदयसिंह पाटील, सागर चाळके, संजय कांबळे, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते.
वाचा : ईर्षा...तणाव...वादावादी; इचलकरंजीत ४५६ उमेदवारी अर्ज दाखल
सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पदयात्रा
शिव-शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सतेज पाटील यांनी शिवतीर्थ ते शंभूतीर्थ अशी पदयात्रा काढली. त्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. अर्ज भरण्यासाठी जाताना शक्तिप्रदर्शन केले.