मतदानावेळी कोल्हापुरात शिरोलीमध्ये भगव्या टोपीवरुन वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 13:20 IST2024-11-21T13:19:15+5:302024-11-21T13:20:25+5:30
शिरोली : भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी विरोध केला, असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला. तर आम्ही टोपीवर कुठे ...

मतदानावेळी कोल्हापुरात शिरोलीमध्ये भगव्या टोपीवरुन वाद
शिरोली : भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी विरोध केला, असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला. तर आम्ही टोपीवर कुठे पक्षाच चिन्ह आहे का हे पाहण्यासाठी आम्ही चौकशी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा संपूर्ण प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावात सकाळच्या सुमारास घडला. यावरून शिरोली गावातील कन्या विद्या मंदिर या बूथवर सुमारे एक तास तणाव निर्माण झाला होता.
शिरोली जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर या मतदान केंद्रांबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमावासह उभे होते. यातील काही कार्यकर्ते इतरत्र फिरत असताना तर काही कार्यकर्ते भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी भगवी टोपी काढण्यास सांगितली. तसेच त्या टोपीवर कुठे पक्षाचे चिन्ह आहे का हे तपासून पाहिले.
यावर हिंदूत्ववाती कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला. आमच्या टोप्या काढणार असाल तर इतर समाजाच्या सुद्धा टोप्या काढा असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यातून जवळपास एक तास तणाव निर्माण झाला होता. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध अथवा विरोध नाही.
कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध
भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी विरोध केला. या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी सरपंच शशिकांत खवरे आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रिया संपल्यावर जाहीर निषेध केला.
आम्ही घातलेल्या भगव्या टोपीला पोलिसांनी विरोध केला. मग इतर समाजाच्या सुद्धा टोप्या काढून मतदान करायला सांगा. आम्ही भगव्या टोप्या घालून मतदान करणार. - प्रशांत कागले - विश्व हिंदू परिषद
शिरोली येथे भगव्या टोपीला पोलिसांनी विरोध केला नाही. आम्ही भगव्या टोपीवर राजकीय पक्षाचे चिन्ह आहे का हे तपासून पाहिले आहे. विनाकारण गैरसमज निर्माण झाला आहे. - सुरेश गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक