Kolhapur: बेंदूर मिरवणुकीत नर्तिका नाचली, लाठी हल्ल्यानंतर तरुणाई पांगली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:07 IST2025-06-14T12:07:18+5:302025-06-14T12:07:42+5:30
साउंड सिस्टमचा दणदणाट, महिलेसह १५ जणांवर गुन्हा

Kolhapur: बेंदूर मिरवणुकीत नर्तिका नाचली, लाठी हल्ल्यानंतर तरुणाई पांगली
इचलकरंजी : बेंदूर सणाचे निमित्त करत सार्वजनिक ठिकाणी साउंड सिस्टमच्या दणदणाटात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करत पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका महिलेसह १५ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल बाजीराव पोवार यांनी फिर्याद दिली आहे.
राहुल योगेश चावरे, प्रथमेश विनायक गायकवाड, आदित्य दादासाहेब शेळके, सागर लक्ष्मण तोरे, सूरज वसंत बन्ने, संकेत सुनील नाकार्डे, अंकुश हुल्लोळी, सलमान नदाफ, विशाल देसाई, सुधीर मडीवाळ, अविनाश पडीयार, श्रेयश जोशी, धिरज मगदूम, तेजस कुरणे यांच्यासह एका महिलेचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. बेंदूर सणानिमित्त गुरुवारी (दि.१२) शंभू बैल ग्रुपचा अध्यक्ष राहुल चावरे व बैलमालक प्रथमेश गायकवाड यांनी मिरवणूक आयोजित केली.
मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉली (एमएच १० एच १९४९) मध्ये साउंड सिस्टममालक आदित्य शेळके (रा. बागणी, ता. वाळवा) हा मोठमोठ्याने गाणी लावून त्या तालावर एक महिला अश्लील हावभाव व असभ्य वर्तन करत नाचत होती. त्यावेळी तिच्याकडे पाहून अन्य संशयित सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत नाचत होते. याबाबत पोलिसांनी सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करत वाहतुकीला अडथळा होईल, अशी कृती करत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.