Kolhapur Crime: सूत पुरवतो म्हणून सांगून व्यापाऱ्याला १ कोटीचा गंडा, पाज जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:20 IST2025-03-05T12:20:32+5:302025-03-05T12:20:56+5:30
इचलकरंजी : मागणीप्रमाणे सूत पुरवतो, असे सांगून येथील एका व्यापाऱ्याची एक कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांची फसवणूक ...

Kolhapur Crime: सूत पुरवतो म्हणून सांगून व्यापाऱ्याला १ कोटीचा गंडा, पाज जणांवर गुन्हा
इचलकरंजी : मागणीप्रमाणे सूत पुरवतो, असे सांगून येथील एका व्यापाऱ्याची एक कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सात सूत व्यापाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मनीषकुमार कैलाशचंद्र धूत (वय ४०, रा. हुलगेश्वरी रोड) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणातील पंकज अग्रवाल याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
अटक केलेल्या पंकज पुष्पक अग्रवाल याच्यासह मयूर पंकज अग्रवाल, वर्षा विशाल अग्रवाल, पियुष पंकज अग्रवाल, प्रवीण पुष्पक अग्रवाल, दिशा प्रवीण अग्रवाल व विशाल ऊर्फ पप्पी अग्रवाल (सर्व रा. कागवाडे मळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, धूत यांचा सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यासाठी ते अग्रवाल यांच्याकडून सूत खरेदी करत होते. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली होती. या विश्वासाचा गैरफायदा घेत सन २०२२ मध्ये धूत यांना लागणारी ३२ सिंगल कार्डेड कॉटर्न यार्न सुताची १०५५ बाचकी आम्ही तुम्हाला देतो, असे सांगत मयूर, पंकज, पियुष व प्रवीण अग्रवाल यांनी धूत यांच्या कार्यालयात येऊन सांगितले. तसेच त्यासाठीची रक्कम टीडीएस वजा करून अॅडव्हान्समध्ये एका फर्मच्या नावे जमा करण्यास सांगितले आणि जानेवारी २०२३ मध्ये सूत माल देतो, असे सांगून निघून गेले.
त्यांच्यावर विश्वास ठेवून धूत यांनी सांगलीच्या एका बॅँकेतून आरटीजीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर वारंवार मागणी करूनही अग्रवाल यांनी धूत यांना सूत दिले नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावर अग्रवाल यांनी बनावट प्रोफॉर्मा इनव्हॉईसेस तयार करून धूत यांना दिले. त्यावरून अग्रवाल यांनी बनावट कागदपत्रांद्वारे अन्य लोकांना सूत माल देऊन अन्य काही जणांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे धूत यांनी अग्रवाल कुटुंबीयांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली.