धक्कादायक! गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे; लोकसभा निवडणुकीत ८० हजार नागरिकांची नावे होती गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 12:37 IST2024-06-21T12:36:54+5:302024-06-21T12:37:25+5:30
पोलिसांनी ही मतदार ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. ही मतदार ओळखपत्रे येथे कोणी टाकली याचा तपास पोलिस करीत आहेत.

धक्कादायक! गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे; लोकसभा निवडणुकीत ८० हजार नागरिकांची नावे होती गायब
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण :कल्याण-शीळ रस्त्याजवळ असलेल्या पिसवली गावाच्या कमानी समोरच गोणी भरून मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गोणीत सापडलेली मतदार ओळखपत्रे ही नेतीवली, सूचक नाका परिसरातील आहेत.
बुधवारी रात्रीच्या सुमारास पिसवली गावाच्या कमानी समोरील रस्त्यावर गोणी भरून मतदार ओळखपत्रे आढळली. मतदार ओळखपत्रांची गोणी काही नागरिकांच्या निदर्शनास आली. हा प्रकार कळताच या भागात नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांनी ही मतदार ओळखपत्रे जमा करून या घटनेबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ही मतदार ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. ही मतदार ओळखपत्रे येथे कोणी टाकली याचा तपास पोलिस करीत आहेत.
‘याचा खुलासा झालाच पाहिजे’
उद्धव सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली दरेकर यांनी सांगितले की, सापडलेली गोणीभर ओळखपत्रे ही खरी आहे की बनावट? याचा खुलासा निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून झाला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतून ८० हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावे गायब होती. या मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी ही मतदार ओळखपत्रे गोणीत भरून ठेवली. गोणीत सापडलेली मतदार ओळखपत्रे बनावट असतील तर त्या नावाने काेणी बोगस मतदान करून मग ही ओळखपत्रे फेकून दिली आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत.