कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:11 IST2026-01-15T10:11:17+5:302026-01-15T10:11:39+5:30
Maharashtra Municipal Election Polls 2026: कल्याण महानगरपालिका पॅनल ९ मध्ये मतदानाची शाई लगेच पुसली जात असल्याची तक्रार मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी केली आहे. काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनीही दिला दुजोरा.

कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॅनल क्रमांक ९ मधील मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई चक्क लगेचच पुसली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे. या प्रकारामुळे पारदर्शक मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुका घेता कशाला?
उर्मिला तांबे या प्रकाराबाबत माहिती मिळताच उर्मिला तांबे यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. "मतदानासाठी बोटाला लावलेली शाई जर लगेच पुसली जात असेल, तर हा काय प्रकार आहे? जर असेच गैरप्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या शाईचा वापर करून बोगस मतदान होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस उमेदवाराचाही पाठिंबा
केवळ मनसे नव्हे, तर काँग्रेसच्या उमेदवार माधवी चौधरी यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला आहे. शाई निकृष्ट दर्जाची असून ती सहजासहजी पुसली जात असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच पॅनलमधील दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी तक्रार केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली.
या तक्रारीनंतर आता निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि शाई बदलली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.