जळगावात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मंडळांतर्फे उत्कृष्ट सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:32 IST2025-09-06T13:29:45+5:302025-09-06T13:32:32+5:30
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जळगाव येथे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

जळगावात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मंडळांतर्फे उत्कृष्ट सादरीकरण
जळगाव : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जळगाव येथे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती करून शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मार्गावरून एकापाठोपाठ मार्गस्थ होत आहे. मानाच्या गणपतीच्या आरती प्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकांवर ड्रोन, सीसीटीव्ही, व्हिडिओ कॅमेरांची नजर आहे.
११ दिवस मंडळात व घरोघरी असलेल्या बाप्पाला ६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक काढून निरोप दिला जात आहे. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दलाकडून पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, अंमलदार (पुरुष), अंमलदार (महिला), आरसीपी प्लाटून, क्युआरटी पथक असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकही लक्ष ठेवून आहे.पोलिस प्रशासन सज्ज असून मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आवश्यक असल्याने त्यांनी वेळेचे पालन करुन सहकार्याची अपेक्षा पोलिस प्रशासनाने व्यक्त केली.
ठरवून दिलेल्या वेळेत उत्कृष्ट सादरीकरण
विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश मंडळातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण केले जात आहे. यासाठी मंडळांना पाच ते सात मिनिटांची वेळ ठरवून देण्यात आली आहे. या दरम्यान उत्कृष्ट वाद्य वादन करण्यासह वारकरी संप्रदायाच्या परंपरेचेही दर्शन मिरवणुकीदरम्यान होत आहे.
अन्य वाहनांसाठी मार्ग बंद
अनंत चतुर्दशीला कोर्ट चौकापासून विसर्जन मार्गच्या दोन्ही बाजूने वाहने ये-जा करू नये, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेटींग करण्यात आले आहे. या मार्गावर मंडळांच्या वाहनांसह पायदळ जाणाऱ्या गणेशभक्तांनाच प्रवेश आहे.
असा आहे बंदोबस्त
पोलिस अधीक्षक - ०१
अपर पोलिस अधीक्षक - १
उपविभागीय पोलिस अधिकारी - ३
पोलिस निरीक्षक - ८
सपोनि, उपनिरीक्षक - ३०
अंमलदार - ५२३
होमगार्ड - ६७
या शिवाय आरसीपी, स्ट्राईकिंग फोर्सच्या तुकड्याही तैनात आहे.
विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत आवरण्यासाठी प्रत्येक मंडळाने काळजी घेतली पाहिजे. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या पुढे जाण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक जण पुढे सरकत राहिला तर सर्व मंडळांना सादरीकरणासाठी वेळ मिळू शकेल. प्रत्येकाने वेळेचे पालन करण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे.
- डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक.
गणेशोत्सव शांततेत पार पडत असून विसर्जनाच्या दिवशीही सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असते. विसर्जनासाठी जागोजागी बंदोबस्त तैनात आहे.
- नितीन गणापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी.