मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:37 IST2024-04-07T15:35:21+5:302024-04-07T15:37:40+5:30
मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.

मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय
Eknath Khadse ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार, हे आता स्पष्ट झालं आहे. स्वत: खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुढील १५ दिवसांत मी स्वगृही परतत असल्याची माहिती दिली आहे. "माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे," असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
भाजप प्रवेशाच्या घडामोडीबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल," अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.
जयंत पाटलांशी केली चर्चा
"भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांना या निर्णयामागील कारणे सांगितली. त्यांची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतरच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला," असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
दिल्लीत होणार पक्षप्रवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांत विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र खडसे यांना याबाबत खुलासा करत माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात नव्हे तर नवी दिल्ली येथे होईल, असं सांगितलं आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून जेव्हा वेळ दिली जाईल, त्यानंतर मी दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करेन, असं ते म्हणाले.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मी कोणत्याही अटी-शर्थी ठेवल्या नसून आधी माझी जी नाराजी होती, ती दूर झाली असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.