जळगावमध्ये शरद पवारांना धक्का; एकनिष्ठ सहकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:22 IST2024-12-07T16:17:49+5:302024-12-07T16:22:38+5:30
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मोठा फटका बसला आहे.

जळगावमध्ये शरद पवारांना धक्का; एकनिष्ठ सहकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर
Gulabrao Devkar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू झालेली पक्षांतराची प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात जाणार असल्याचे सांगितले आहे.
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतलीय या भेटीमध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जळगावमध्येशरद पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये गुलाबराव देवकर यांचा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्याकडून पराभव झाला आहे.
"विधानसभेच्या पराभवानंतर मतदार संघातल्या सर्व कार्यकर्त्यांची मी एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करत असताना सर्वच कार्यकर्त्यांचा सूर असा होता की गेल्या दहा वर्षापासून आपण सत्तेच्या विरोधात आहोत. अनेक अडचणींना सामोरे जात असताना. लढा देताना आपल्याला इथपर्यंत यावं लागलं आणि आता आशा होती की आपण निवडून आल्याच्या नंतर सत्तेमध्ये येऊ. परंतु दुर्दैवाने पराभव झाला त्यामुळे कार्यकर्त्यांची हिंमत खचली आहे. आता पाच वर्ष पुन्हा विरोधात राहावं लागेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे आपण कुठेतरी सत्तेत गेलं पाहिजे ही भावना सर्वच कार्यकर्त्यांची होती. त्यानंतर जळगावच्या तालुका अध्यक्ष यांनी सुनील तटकरे यांना फोन केला होता. सुनील तटकरे यांनी मला फोन करून मुंबईला बोलावलं. मी परवा मुंबईला जाऊन आलो. त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की मी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी पण तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे, आमच्या पक्षात आलं पाहिजे अशी संमती दिलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही पक्षात यावं, तुमचा सन्मान आम्ही ठेवू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मी त्यांना संमती दिली आहे," असं गुलाबराव देवकर म्हणाले.
"शरद पवार यांच्यासोबत बोलण्यासाठी धावपळीमध्ये वेळ मिळालेला नाही. पण तिथे गेल्यानंतर लगेच हा संमतीचा निर्णय झाला. त्यामुळे मी अद्याप पर्यंत शरद पवार यांच्या सोबत बोलू शकलो नाही. सोमवारी मी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी जाणार आहे. त्या दिवशी सविस्तर पणाने चर्चा होईल. कधी प्रवेश करायचा आणि कशा पद्धतीने प्रवेश करायचा हे त्यावेळी ठरेल," असंही देवकर म्हणाले.