चालता-बोलता खून, जीवघेणे हल्ले; जालन्यातील गुंडगिरी, दादागिरीला जबाबदार कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:58 IST2026-01-12T14:58:03+5:302026-01-12T14:58:14+5:30
२०२४ पेक्षा २०२५ मध्ये वाढले गुन्हे : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप

चालता-बोलता खून, जीवघेणे हल्ले; जालन्यातील गुंडगिरी, दादागिरीला जबाबदार कोण ?
जालना : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आखाडा सध्या विकासाच्या मुद्द्यांऐवजी गुन्हेगारी आणि आरोपांच्या धुरळ्याने व्यापला आहे. शहरात वाढलेली गुंडगिरी, दिवसाढवळ्या होणारे हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे सामान्य जालनेकर भयभीत झाले आहेत. "वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्ह्यांचा आलेख प्रचंड वाढला असून, राजकीय नेते आता सोयीस्करपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
जालना शहरात आता चालता-बोलता किरकोळ कारणावरून गावठी पिस्तूल, तलवार किंवा चाकू काढून हल्ले केले जात आहेत. भर दुपारी माजी सरपंचाचा झालेला खून असो किंवा व्यापाऱ्यांकडे मागितली जाणारी खंडणी, या घटनांनी जालन्याची शांतता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, जेव्हा या घटना घडत होत्या, तेव्हा एकाही लोकप्रतिनिधीने ठोस आवाज उठविला नाही. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या जोगव्यासाठी सर्वच राजकीय पक्ष गुन्हेगारीचा मुद्दा पुढे करून एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत.
पोलिसांकडून कारवायाचा बडगा, पण...?
एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांनी आपली कारवाईची गती वाढविल्याचा दावा केला आहे. मात्र, तरीही गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरली नसल्याचे चित्र आहे. २०२५ मध्ये पिस्तूल आणि तलवारी जप्त करण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी तडीपार आणि मोक्कासारख्या कडक कारवायांचा अवलंब केला आहे. २०२५ मध्ये तब्बल ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, चार टोळ्यांवर 'मोक्का' लावण्यात आला आहे. पोलिसांकडून कारवाया केल्या जात असल्या तरी गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसत आहे.
खुनाचे सात, तर हल्ल्याचे चार गुन्हे वाढले
जालना जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक रीतीने उंचावला आहे. २०२४ मध्ये खुनाचे ३८ गुन्हे नोंदविले गेले होते, मात्र २०२५ मध्ये हा आकडा ४५ वर पोहोचला असून त्यात ७ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. तसेच, जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली असून, २०२४ च्या तुलनेत ४ गुन्हे वाढून ही संख्या ९२ वर पोहोचली आहे. ही आकडेवारी जिल्ह्याची आहे. या वाढत्या हिंसेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
निवडणुका आल्या की नेत्यांना 'जाग'!
वर्षभर जनसामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे नेते निवडणूक जाहीर होताच गल्लीबोळांत सक्रिय होतात. प्रलंबित विकासकामे, रखडलेले रस्ते आणि गुन्हेगारीचा प्रश्न अचानक ऐरणीवर येतो. आश्वासनांचा पाऊस पाडत घराघरांत पोहोचणारे हे नेते मतांच्या गणितासाठीच 'जागृत' होतात, अशी भावना आता सर्वसामान्य जालनेकरांमध्ये उमटत आहे. आतापर्यंत या नेत्यांना जालन्यातील गुन्हेगारी दिसली नाही का ? दिसली तर यांनी काय केले ? केवळ निवडणुकीतच एकमेकांवर चिकलफेक कशासाठी ? असे अनेक प्रश्न आता सामान्यांमधून विचारले जात आहेत.
अशा केल्या कारवाया
गुन्ह्याचा प्रकार - २०२३ - २०२४ - २०२५ पिस्तूल/कट्टे - २० - १६ - ३३
तलवार - ५९ - ९० - १०४
पोलिसांनी केल्या कारवाया
प्रकार - २०२३ - २०२४ - २०२५
तडीपार - २१ - २५ - ५०
एमपीडीए - ४ - ९ - १०
मोक्का - ०० - १ - ४