Many people have to stay away from voting | अनेकांना राहावे लागले मतदानापासून वंचित
अनेकांना राहावे लागले मतदानापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदान पार पडले. सकाळपासून जालनेकरांनी मतदानासाठी हजेरी लावली होती. उन्हामुळे अनेक बुथवर नागरिकांनी सकाळीच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. परंतु, काही मतदारांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले.
मतदार यादीतील गोंधळ या निवडणुकीतही कायमच होता. काहींची नावे गहाळ होती. तर अनेकांचे मतदान केंद्रच बदर्लले होते. जालना शहरातील सेंट मेरी स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले जनार्दन किसन आकुलकर व स.भु येथील बुथवर सीताबाई गोविंदावर सातपुते यांच्याकडे मतदान ओळखपत्र असतानाही त्यांचे यादीत नाव आले नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मतदारांना विविध सुविधा मतदान केंद्रावर देण्यात आल्या होत्या. महिला मतदारांसाठी आयोगाने सखी मतदान केंद्राची स्थापना केली होती, तर दिव्यांगासाठी विविध सुविधाही देण्यात आल्या होत्या. परंतु, याद्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला.
जालना लोकसभा मतदार संघातील काही बुथवर नागरिकांना आपली नावे शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तर काहींकडे ओळखपत्र असतानाही त्यांचे यादीत नावे नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तर अनेकांचे मतदान केंद्रही बदल्यामुळे त्यांना हेलपाटे मारावे लागले.
मतदार यादीत तरुणांबरोबर वृध्दांची नावे नव्हती. यात काहींची आॅनलाईन पाहणी केल्यानंतर मिळाली. तर काहींची नावे सापडली नाहीत. त्यामुळे हेलपाटे मारावे लागले. अनेकांची नावे दोन दोन मतदान केंद्राच्या यादीत आढळून आल्याने देखील गोंधळाचे वातावरण होते.
दुर्लक्ष : व्हीलचेअर नावापुरत्याच, काहींचे फोटोसेशन
जालना : दिव्यांग मतदारांना सुविधा पुरविल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात मात्र, काही बुथवर दिव्यांग व्यक्तींना कुठलीही सुविधा मिळाली नसल्याचे समोर आले. जालना शहरातील काही बुथची पाहाणी केली असता, दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी व्हीलचेअर नसल्याचे समोर आले.
जिल्ह्यातील मतदार संख्या लक्षात घेऊन निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची तगडी तयारी केली होती. नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क कुठल्याही अडथळ््याविना बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
६ विधानसभा मतदार संघात २ हजार ०५८ मतदार केद्रांची सोय करण्यात आली होती. यातील ५ मतदान केंद्रे ही महिलांच्या हाती तर ५ दिव्यांगाच्या हाती होती. दरम्यान, जालना मतदार संघात ११ हजार ०७३ दिव्यांग मतदार आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रावर ये- जा करण्यासाठी व्हीलचेअर मिळाली नाही.
अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग आणि वृद्धांसोबत आलेले मदतनीस देखील सेल्फी काढतांना दिसून आले.
रूख्मिणीबाई हयातनगर या ९५ वर्षाच्या महिलेने वॉकरची मदत घेऊन मंगळवारी मतदान केले. सोबत डॉ. हयातनगरकर दाम्पत्य.


Web Title: Many people have to stay away from voting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.