वंचित आघाडीची मते जालन्यात निर्णायक ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:48 IST2019-04-11T15:47:12+5:302019-04-11T15:48:02+5:30
वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव फारसा नाही; परंतु त्यांची मते निर्णायक ठरतातील

वंचित आघाडीची मते जालन्यात निर्णायक ठरणार
- संजय देशमुख
जालना : जालना लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव फारसा नाही; परंतु त्यांची मते निर्णायक ठरतात. मागील लोकसभा निवडणुकीत डॉ. शरदचंद्र वानखेडे हे बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढले होते. त्यांना त्यावेळी तिसऱ्या क्रमांकांची मते मिळाली होती.
जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास १२ टक्के मुस्लिमांची संख्या असून, जास्त करून या समाजाचे मतदान हे काँग्रेसकडे वळलेले असते. जालना लोकसभा मतदारसंघात ओबीसींचा विचार केल्यास मराठा समाजानंतर सर्वात मोठा समाज म्हणून याकडे पाहिले जाते. हा समाज गेल्यावेळी पूर्णत: भाजपकडे वळला होता, परंतु यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे.
या सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली, परंतु त्यासाठी कुठलाच निधी न ठेवता, केवळ पाचवर्ष झुलवत ठेवल्याची नाराजी या समाजात दिसून येते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हा समाज भाजपच्याच बाजूने होता. वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. वानखेडे हे गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार होते. त्यांना जेवढी मते मिळतील तेवढा तोटा हा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.