समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:58 IST2026-01-09T18:57:02+5:302026-01-09T18:58:31+5:30
'भाजपमुळे देशात अराजकता माजत असून, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.'

समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
जालना : भाजपमुळे देशात अराजकता माजत असून, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे मतदारांनी निवडणुका गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. समृद्धी महामार्गातील दोन हजार कोटींच्या घोटाळ्यातून ५० खोके एकदम ओके झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
जालना येथील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. डाॅ. कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार संतोष सांबरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, राष्ट्रवादीचे (शरद पवार), जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख व इतरांची उपस्थिती होती. भाजप पैशांचा घोडेबाजार आणि गुंडांचे बळ निवडणूक प्रक्रियेत वापरत आहे.
प्रशासकीय यंत्रणेचाही वापर केला जात असून, हा प्रकार लोकशाहीला पांगळे करण्याचा आहे. भाजपला केवळ विलासराव देशमुखच नव्हे तर शंकरराव चव्हाण, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह इतर नेतेमंडळींच्या आठवणी पुसायच्या आहेत. आरएसएसच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पुतळे लावायचे आहेत. भाजपचा अहंकार सुरू असून, तो संपविण्याचे काम मतदारांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसयुक्त भाजप
काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा अजेंडा होता. परंतु, आता काँग्रेसयुक्त भाजप झाला आहे. त्यांना मित्रपक्षही गिळंकृत करावयाचे आहेत. अजित पवारांनी अगोदर राजीनामा द्यावा आणि नंतरच टिका करावी, असेही सपकाळ म्हणाले.
गडकरींना बाहेर केले
भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही नागपूर महानगरपालिका निवडणुकीत माशीसारखे बाहेर करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसांना सर्वत्र मी आणि मीच हवा असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.