जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:11 IST2025-12-24T15:10:37+5:302025-12-24T15:11:38+5:30
मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं इथल्या नेत्यांनी ठरवले असेल तर त्याला मी काय करू शकतो असं सांगत त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.

जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
जालना- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा केली आहे तर दुसरीकडे भाजपा-शिंदेसेनेत जागावाटपाचा तिढा कायम आहे. जालना महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेने गेल्या २ महिन्यापासून भाजपाकडे युतीचा प्रस्ताव दिला आहे. परंतु भाजपाकडून कुठलेही उत्तर शिंदेसेनेला मिळत नाही. त्यामुळे नाराज शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जर भाजपाने युती केली नाही तर आमच्याकडे शहराच्या विकासासाठी सर्व पर्याय खुले आहेत असा इशारा दिला आहे.
आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, आम्ही २ महिन्यापूर्वी भाजपाला युतीसाठी प्रस्ताव दिला आहे अजून त्याबाबत वाट पाहतोय. रावसाहेब दानवे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते काय चर्चा करतात पाहू. परंतु भाजपा स्वबळावर लढण्याची तयारी करतंय असं वाटू लागले आहे. जर त्यांना युतीबाबत गांभीर्याने बोलायचे असते तर त्यांनी चर्चा केली असती. ही कार्यकर्त्यांची निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे परंतु तसे होत नाही. बावनकुळे हे महायुतीचे समन्वयक आहेत. त्यांच्याशी चर्चा केली त्यात महायुती व्हावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांनी तशा सूचनाही दिल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं इथल्या नेत्यांनी ठरवले असेल तर त्याला मी काय करू शकतो असं सांगत त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.
तसेच आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. इतर पक्षातील नेते आम्हाला येऊन भेटतात. शहराच्या विकासासाठी आपण युती करूया असं बोलतायेत. त्यामुळे तो विचारही केला जात आहे. भाजपा येत नसेल तर आम्हाला पर्याय शोधावा लागेल. आम्हाला कुणी वर्ज्य नाही. भाजपाला आम्ही प्रस्ताव दिला आहे परंतु त्यांनी जर युती केली नाही तर आम्हाला पर्याय शोधावा लागेल. त्यामुळे शहराच्या विकासासाठी आम्ही कुणासोबतही जायला तयार आहे असं सांगत अर्जुन खोतकर यांनी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडीचे संकेत दिले.
दरम्यान, भाजपाचे निवडणूक प्रमुख चंद्रेशखर बावनकुळे यांच्यासमवेत शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी बैठक घेतली आहे. त्याशिवाय राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही मंगळवारी आमदार खोतकर यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु महायुतीत अद्याप काहीही निश्चित झाले नाही.