अपूर्ण शपथपत्र, तीन अपत्यांमुळे इच्छुक बाद ! २६ अर्ज फेटाळले, १२३४ अर्ज कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:20 IST2026-01-01T13:19:07+5:302026-01-01T13:20:30+5:30
बंडखोरी रोखण्याचे नेत्यांसमोर आव्हान

अपूर्ण शपथपत्र, तीन अपत्यांमुळे इच्छुक बाद ! २६ अर्ज फेटाळले, १२३४ अर्ज कायम
जालना : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल १२६० अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जाची बुधवारी ३१ डिसेंबर रोजी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत २६ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, तर १२३४ अर्ज कायम आहेत. ६५ नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक होत असून, २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. पुढील दोन दिवसांत किती उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे सर्वपक्षीय उमेदवारांसह नेत्यांच्याही नजरा आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० डिसेंबर रोजी युतीतील नेत्यांच्या चर्चा फिस्कटल्या. त्यामुळे भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीने (अजित पवार) स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तर राष्ट्रवादीने (अजित पवार) मनसेला सोबत घेतले आहे. महाविकास आघाडीची मोट कायम असून, काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे पक्ष एकत्र निवडणूक वडणूक लढवित आहेत. या निवडणुकीत केंद्र, राज्यात सत्तेत असलेल्या तीन प्रमुख पक्षाने स्वतंत्र पॅनल उभा केले आहे. तर मविआ एकत्र लढत आहे. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनेही उमेदवार दिले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
नेतेमंडळींना बंडखोरी शमविण्याचे आव्हान
प्रमुख पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. प्रमुख पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली, तर पक्षाच्या उमेदवारालाच त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे बंडखोरी शमविण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींना पुढील दोन दिवस राजकीय अनुभव पणाला लावावा लागणार आहे.
अपक्षांचा भरणा अधिक
मनपा निवडणुकीसाठी तब्बल १२३४ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडून वैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी आहे. बंडखोरी शमविण्यासह अपक्षांनीही माघार घ्यावी, यासाठी नेतेमंडळींना जोर लावावा लागणार आहे.
कोणत्या कारणांमुळे उमेदवारी अर्ज ठरले बाद?
जालना महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत बुधवारी दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननी प्रक्रियेमध्ये २६ अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. कोणाला तीन आपत्ये असणे, कुणाचे शपथपत्र अपूर्ण असणे, प्रस्तावकाची बनावट स्वाक्षरी असणे, जात वैधता प्रमाणपत्राची पावती वेळेत सादर न केल्याने हे अर्ज फेटाळले आहेत. उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेनंतर आता २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ३ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार असून, त्यानंतर निवडणुकीतील प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरूवात होणार आहे.