कधीही न जुळणारी समीकरणं जालन्यात जुळली! राष्ट्रवादी (अप) अन् मनसेची 'हातमिळवणी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:35 IST2025-12-30T19:32:02+5:302025-12-30T19:35:08+5:30
जालन्यात राजकीय भूकंप! पहिल्या महापौरासाठी नवी समीकरणं

कधीही न जुळणारी समीकरणं जालन्यात जुळली! राष्ट्रवादी (अप) अन् मनसेची 'हातमिळवणी'
जालना: जालना महानगरपालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकीत राजकीय समीकरणांचा मोठा स्फोट झाला आहे. महायुतीत जागावाटपावरून तिढा सुटत नसल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीला 'जय महाराष्ट्र' करत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) हातमिळवणी केली आहे. या नव्या युतीमुळे जालन्यातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पालटले आहे.
'घड्याळ' आणि 'इंजिन' एकत्र
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५० जागा लढवणार असून, मनसेला ६ जागा देण्यात आल्या आहेत. "जालन्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," अशी घोषणा दोन्ही पक्षांनी केली आहे.
महायुतीत फूट, मविआची एकजूट
दुसरीकडे, महायुतीमधील इतर घटक पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप ६४ जागांवर तर रिपाइं (आठवले गट) १ जागेवर लढत आहे. शिंदे गटाने सर्व ६५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याउलट, महाविकास आघाडीने मात्र एकजूट दाखवत काँग्रेस (४०), शरद पवार गट (१३) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (१२) असे जागावाटप निश्चित केले आहे.
कोणाचं वर्चस्व राहणार?
जालना महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने 'पहिला महापौर' आपलाच असावा, यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महायुतीमधील अंतर्गत फुटीचा फायदा महाविकास आघाडीला मिळणार की, राष्ट्रवादी-मनसेची नवी युती चमत्कार घडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.