"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:05 IST2025-12-30T17:02:14+5:302025-12-30T17:05:15+5:30
महापालिका निवडणुकीत भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतल्याचे जाहीर केले. मात्र अनेक महापालिकांमध्ये काडीमोड झाल्याचे चित्र आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये युती फिस्कटली आहे.

"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
जालना महापालिका निवडणुकीत भाजपा-शिंदेसेना एकत्र लढणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगितले जात होते. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युती तुटल्याची घोषणा भाजपाकडून करण्यात आली. भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी याबद्दलचा निर्णय जाहीर करतानाच भाजपा जालना महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले.
छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ जालन्यामध्येही शिंदेसेना-भाजपा युती तुटली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर युती तुटल्याचे खापर फोडले. तर जालन्यामध्ये भाजपाच्या नेत्याने युती तुटण्याला शिंदेसेनेला जबाबदार धरले.
अर्जून खोतकर म्हणाले माझ्याकडे ताकदवान लोक
भाजपाचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, "जिथे कैलास गोरंट्याल यांचे २३ सदस्य आहेत, तिथे अर्जून खोतकरांचे म्हणणे होते की, त्या जागांवर माझ्याकडे ताकदवान लोक आहेत. हे लोक त्या २३ जागा जिंकू शकतात. १०-१२ जागांचा हा वाद होता."
"हा विषय आम्ही पक्षपातळीवर पाठवला होता. जवळपास ९९ टक्के युती झाली होती. पण, राज्याच्या धोरणात सूत्रामध्ये न बसल्यामुळे ही युती तुटलेली आहे", अशी अधिकृत घोषणा बबनराव लोणीकर यांनी केली.
परभणीमध्येही भाजपा-शिंदेसेनेची युती तुटली?
भाजपा आणि शिंदेसेनेच्या नेत्यांनी महायुती झाल्याची घोषणा केली होती. मात्र, दोन्ही पक्षांकडून सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदेसेना भाजपाची युती तुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेची युती तुटली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची घोषणा केली. "भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मुद्दाम चर्चेत वेळ मारून नेली. युतीच्या चर्चा सुरू असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेला कमी लेखणारे प्रस्ताव द्यायचे ही दुहेरी भूमिका भाजपाने घेतली", असा आरोप शिरसाट यांनी केला. भाजपाच्या अहंकारामुळेच युती तोडत आहे, असे सांगत त्यांनी काडीमोड झाल्याची घोषणा केली.
उदय सामंत म्हणतात, 'कुठेही युती तुटलेली नाही'
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये युती तुटल्याची स्थिती आहे. मात्र, शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी हे फेटाळून लावले आहे.
"पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात सांगितले असेल, पण मी शिवसेनेच्या वतीने सांगतोय की महायुती तुटली असे चित्र महाराष्ट्रात कुठेही नाही. छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे, ते देखील आम्ही दोन दिवसात दूर करू. नेतेमंडळींना आपापसात बोलायला वेळ कमी मिळाला. आता तीन-चार दिवस आम्हाला बोलायला वेळ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीदेखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये. पुढचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील", असे खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.