जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी
By विजय मुंडे | Updated: April 27, 2024 19:45 IST2024-04-27T19:45:02+5:302024-04-27T19:45:30+5:30
लोकसभेचा आखाडा : यंदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार राहणार नाही.

जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी
जालना : जालना लोकसभा निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत १२ जणांचे अर्ज बाद झाले असून, ३५ जणांचे अर्ज राहिले आहेत. त्यातही विविध पक्षाकडून उमेदवारी मिळविणारे १२ आणि अपक्ष २३ उमेदवार आहेत. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २९ एप्रिलची मुदत असून, या मुदतीत किती उमेदवार निवडणुकीतून माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे. विशेषत: अधिकाधिक अपक्षांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी पदाधिकाऱ्यांकडूनही मनधरणी केली जात आहे.
चौथ्या टप्प्यात होणाऱ्या जालना लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीकडून रावसाहेब दानवे, मविआकडून डॉ. कल्याण काळे, वंचितकडून प्रभाकर बकले यांना उमेदवारी मिळाली आहे. शिवाय अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत ४७ जणांनी ६७ अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रिया शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पार पडली. त्यात १२ जणांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. तर आता ३५ उमेदवारांचे अर्ज राहिले असून, त्यातही अपक्षांची संख्या २३ आहे. अधिकाधिक अपक्ष निवडणूक रिंगणात राहिले तर मतांचे विभाजन होणार आहे आणि पर्यायाने याचा फटका प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळे अपक्षांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु, २९ एप्रिल पर्यंत किती अपक्ष निवडणुकीतून माघार घेणार आणि कितीजण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार याकडेच मतदार संघाचे लक्ष लागले आहे.
एकही महिला उमेदवार नाही
जालना लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत निला गौतम काकडे या एकमेव अपक्ष महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. परंतु, छाननी प्रक्रियेत निला काकडे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार राहणार नाही.