इंदूरमधील दूषित पाण्यात आढळला 'फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया', किती धोकादायक? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:03 IST2026-01-05T16:01:27+5:302026-01-05T16:03:37+5:30
Contaminated Water In Indore: फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरियामुळे कोणते आजार होतात?

इंदूरमधील दूषित पाण्यात आढळला 'फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया', किती धोकादायक? जाणून घ्या...
Contaminated Water In Indore: मध्यप्रदेशातील इंदूर शहरात दूषित पाण्यामुळे गंभीर आरोग्य संकट निर्माण झाले आहे. शहरातील भागीरथपुरा परिसरात 10 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, उलटी-जुलाबाच्या 1500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, ज्या पाण्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला, त्या पिण्याच्या पाण्यात 'फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया' आढळल्याने खळबळ उडाली आहे.
नर्मदेपाठोपाठ बोअरवेलचे पाणीही दूषित
महापालिकेच्या तपासणीनुसार, सुरुवातीला नर्मदा नदीतील पाणी दूषित असल्याचे समोर आले होते. मात्र, आता भागीरथपुरा परिसरातील बोअरवेलचे पाणीही दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाण्यात फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळले असून, हे बॅक्टेरिया पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात.
काय आहे फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया ?
इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, या संदर्भात माहिती देताना डॉ. विशाल खुराना (डायरेक्टर, गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभाग, मेट्रो हॉस्पिटल, फरीदाबाद) यांनी सांगितले की, फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया हे सूक्ष्मजंतू मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतात. पाणी किंवा अन्नामध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे मलमूत्रामुळे झालेले प्रदूषण (Fecal Contamination) असल्याचे संकेत मानले जातात. पिण्याच्या पाण्यात हे बॅक्टेरिया आढळणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते.
कोणते आजार होऊ शकतात?
फीकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया स्वतः आजार पसरवत नाहीत, मात्र त्याच्या सोबत ई-कोलाई, साल्मोनेला, शिगेला यांसारखे घातक जंतू असण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील आजारांचा धोका वाढतो-
- उलटी-जुलाब
- पोटदुखी
- टायफॉईड
- कॉलरा (हैजा)
- हिपॅटायटिस-A
विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण यांच्यासाठी हा संसर्ग अधिक धोकादायक ठरू शकतो.
बचावासाठी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, या बॅक्टेरियापासून बचावासाठी पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच पिणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे, दूषित पाणी व अन्न टाळणे आणि उघड्यावर शौच करण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे.