नवरदेवाच्या बग्गीचे चाक अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:13 IST2025-04-22T11:12:36+5:302025-04-22T11:13:34+5:30
एक महिला जखमी : लोहारा येथील घटना

Woman dies on the spot after groom's buggy wheel runs over her
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा (गोंदिया): नवरदेवाची वरात काढलेल्या बग्गीचे (वाहन) ब्रेक फेल होऊन बग्गी अंगावरून गेल्याने एक महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री तालुक्यातील लोहारा येथे घडली. गोपिका भाऊलाल ढोमणे (७०) रा. गोंडमोहाडी, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया असे मृतक महिलेचे तर कांताबाई टीकाराम भंडारी (६०) रा. घोटी, ता. गोरेगाव असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार लोहारा येथे मुकेश सहारे यांच्या दोन मुलींचा लग्न सोहळा रविवारी (दि.२०) त्यांच्या निवासस्थानी लोहारा येथे आयोजित केला होता. दोन्ही नवरदेव लोहारा येथे आले होते. नवरदेवाची वरात एका बग्गीतून (वाहन) काढण्यात आली. वरात वधूच्या मंडपी पोहोचत असताना रस्त्यावर गोपिका ढोमणे यांचा पाय रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेल्याने त्या रस्त्यावर नवरदेवाच्या बग्गी समोर पडल्या. दरम्यान त्याचवेळी बगीचे ब्रेक न लागल्याने बग्गी सरळ गोपिका ढोमणे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कांताबाई टीकाराम भंडारी या गंभीर जखमी झाल्या. उपस्थित वन्हार्डी मंडळींनी जखमीला त्वरित रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना दिली. याप्रकरणी तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.