गोंदिया जिल्ह्यातील १२,३२१ विद्यार्थी गेले कुठे? मुलांसाठी शोधमोहीम चालू
By नरेश रहिले | Updated: August 14, 2025 18:23 IST2025-08-14T18:22:21+5:302025-08-14T18:23:12+5:30
ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थ्यांचा शिक्षण विभागाकडून शोध : शाळाबाह्य मुलांचीही शोधमोहीम

Where did 12,321 students of Gondia district go? Search operation underway for children
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या वर्षीही सारखी असायला पाहिजे. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थिसंख्या कमी आढळली. ती मुले ड्रॉप बॉक्स म्हणून संबोधिली जातात. वर्ष २०२४-२५ मधील मुले वर्ष २०२५-२६ मध्ये बरोबर पाहिजे होती. परंतु, तब्बल १२ हजार ३२१ मुले ही गोंदिया जिल्ह्यात ड्रॉप बॉक्समध्ये आहेत. त्या ड्रॉप बॉक्समधील मुलामुलींचा शोध घेण्यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाने जोमाने कामाला सुरुवात केली आहे.
विद्यार्थीनिहाय माहिती कशी काढावी, शाळाबाह्य मुलांची सांख्यिकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहिण्याची पद्धत, बालरक्षक नोंदणी लिंक व टास्क लिंक यावर सखोल माहिती देऊन यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक मूल शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षकांची चळवळ उभी करण्यात आली. बालरक्षकांमध्ये आत्मीयता व सहानुभूतीची आवश्यकता आहे. याबाबत जि.प.च्या शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्ह्यात 'मिशन झिरो ड्रॉपआउट' राबविले जाणार आहे. याअंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी दिली.
काय आहे 'मिशन ड्रॉप'?
पहिल्या वर्गात असलेली बालके दुसऱ्या वर्षी दुसरी ते दिसायला हवीत. मात्र, पहिलीत दाखल बालके दुसऱ्या वर्षी दुसरीत दिसत नाहीत, त्यांना गळती झालेली मुले संबोधतात. त्या बालकांना ड्राप बॉक्स, असे संबोधले जाते. तो ड्रॉप बॉक्स निरंक करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉप बॉक्स नाव देण्यात आले.
वर्ष २०२५-२६ या वर्षातील ड्रॉप बॉक्समध्ये असलेली तालुकानिहाय बालके
आमगाव - ११४६
अर्जुनी-मोरगाव - १५५१
देवरी - ७९०
गोंदिया - ४७२५
गोरेगाव- १०११
सडक-अर्जुनी- ८३०
सालेकसा- ७८९
तिरोडा- १५७९
एकूण - १२३२१
विविध समित्यांचे गठन
यासाठी विविध स्तरांवर समित्या आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका जन्म-मृत्यू कागदपत्रांचा आधार घेऊन कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल. तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांची, मूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतरित होणाऱ्या मुलांची, अन्य वस्तीतून शाळा वस्तीत स्थलांतरित होणाऱ्या मुलांची माहिती घेतली जाईल. तसेच वस्ती, वाडी, गाव, वॉर्ड या स्तरावर सर्वेक्षण करण्यात येईल. ग्रामस्तरावरील समिती प्रत्येक घरी जाऊन गावातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात दाखल होईल याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
दुर्लक्षामुळे मुले ड्रॉप झाली
स्थलांतर होणाऱ्या पालकांमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. पोटाची खळगी भरण्यासाठी या गावातून त्या गावात जाणारे पालक आपल्या मुलांना शाळेत टाकत नाहीत. शाळेत टाकले तरी ते नेहमी शाळेत जात नाही. एका गावातून दुसऱ्या गावात गेल्यानंतर तेथील शाळेत आपल्या मुलांना पाठवत नाही. त्याचा शोथ शिक्षण विभागही घेत नाही. त्यामुळे ड्रॉप बॉक्समध्ये मुले आढळतात.
कुटुंबाला रोजगार द्या, मुले शाळेत येतील
"अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत समस्या समाजातून अजूनही मिटल्या नाहीत. पोटाची आग विझविण्यासाठी आईवडिलांना लहान मुलेही सहकार्य करतात. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या हाताला रोजगार दिल्यास मूल शाळाबाह्य राहणार नाही."
- शारदा सोनकवरे, सामाजिक कार्यकर्त्या