हिवाळ्यात सांधेदुखी टाळण्यासाठी काय करावे? कशी काळजी घ्यावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:14 IST2024-12-04T17:13:17+5:302024-12-04T17:14:06+5:30
सांध्यांचे जुनाट आजार : थंडीच्या दिवसात अतिश्रम टाळण्याचा सल्ला

What to do to prevent joint pain in winter? How to care
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हिवाळ्यातील बोचरी आणि गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते; मात्र हीच थंडी सांध्यांचे आजार असलेल्यांसाठी त्रासदायक ठरते. थंडीत सांध्यांचे जुनाट आजार डोके वर काढत असल्याने प्रत्येकाने हाडांचे आरोग्य जपावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
आहारात पोषक तत्त्वांचा अभाव, बदलती जीवनशैली, एकाच सांध्यावर नियमितपणे भार पडत राहणे, मोबाइल व संगणकावर तासन्तास चिकटून राहणे, हाडांचे फ्रैक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने, अनुवंशिकता, आहारात कॅल्शिअमची कमी आदी कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास बळावतो, असे अस्थिरोग तज्ज्ञ सांगतात. हाडे-सांधेदुखीने वयाची बंधने तोडली आहेत. कमी वयातही अनेकांना हाडे-सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सांधेदुखी टाळण्यासाठी थंडीच्या दिवसांत अति श्रमाची कामे करणे टाळावे, तसेच झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात ठेवावे, त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घ्यावी.
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम आवश्यक !
- शरीरात कॅल्शिअमची मात्रा कमी झाल्याने सांधेदुखीचा त्रास वाढतो.
- हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम खूप गरजेचे असते.
- कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन 'डी'च्या माध्यमातून कॅल्शिअम मिळते.
- दैनंदिन आहारात कॅल्शिअम देणारी जीवनसत्त्वे (मुळा, गाजर, मेथी, इतर भाजीपाला) घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला
"हिवाळ्यात संधिवाताचा त्रास असलेल्यांना मुख्यत्वे सांधे खूप दुखू लागतात. हलका व्यायाम आणि व्हिटॅमिन डी यावर भर द्यावा. थंडीमध्ये अधिक श्रमाची कामे टाळावीत."
- डॉ. बी. एन. झाडे, अस्थिरोग तज्ज्ञ
"हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम खूप महत्त्वाचे आहे. सकाळच्या कोवळ्ळ्या उन्हातून कॅल्शिअम मिळू शकते. सांधेदुखीचा त्रास जाणवला तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."
- डॉ.एम.बी. राऊत, अस्थिरोग तज्ज्ञ
काय काळजी घ्यावी?
- सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत.
- थंड पाण्यात काम करणे टाळावे. शिळे आणि थंड अन्न घेऊ नये..
- कोमट पाणी पिणे, ताजा व गरम आहार घ्यावा.
- हिवाळ्यात हलका व्यायाम करावा. यामुळे आपल्या शिरा मोकळ्या होतात.