इकडे मोटारसायकल चोरली, तिकडे लगेच हातात बेड्या, चार तासांतच चोरट्याला पकडले
By नरेश रहिले | Updated: February 27, 2024 17:17 IST2024-02-27T17:15:46+5:302024-02-27T17:17:21+5:30
शहर पोलिसांची कामगिरी.

इकडे मोटारसायकल चोरली, तिकडे लगेच हातात बेड्या, चार तासांतच चोरट्याला पकडले
नरेश रहिले, गोंदिया : घरासमोर उभी असलेली मोटारसायकल चोरून नेणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अवघ्या चार तासांत पकडले. त्याच्याकडून चोरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. शहरातील मनोहर चौकातून ही दुचाकी २६ फेब्रुवारी रोजी चोरीला गेली होती.
शहरातील मनोहर चौक निवासी सतीश निर्मल शर्मा (३६) यांची मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एके ६७६६ घरासमोर उभी असताना २६ फेब्रुवारीला आरोपी राजेंद्रनाथ सूरजनाथ ठाकरे (२५, रा. पंचशील चौक, देवरी) याने चोरून नेली होती. ३० हजार रुपये किमतीची ही मोटारसायकल असल्याने सतीश शर्मा यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाने राजेंद्रनाथ ठाकरे याला संशयावरून अटक केली. त्याच्याकडून ही मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, त्याने आणखी काही वाहने चोरी केली आहेत काय, याची चौकशी केली जात आहे.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलिस हवालदार सुदेश टेंभरे, जागेश्वर उईके, निशिकांत लोंदासे, सतीश शेंडे, दीपक राहांगडाले, प्रमोद चव्हाण, शिपाई सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते, करण बारेवार, अशोक रहांगडाले यांनी केली आहे. तपास पोलिस हवालदार सतीश शेंडे करीत आहेत.