पानटपरीवरील चर्चेतून प्रकार आला उघडकीस; मालकाने चालकाचा खून करून प्रेत पुरले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:27 IST2024-10-05T16:26:33+5:302024-10-05T16:27:45+5:30
शहर पोलिसांनी सिनेस्टाइल केला खुनाचा उलगडा : दोघांना अटक, चार ते पाच आरोपी फरार

The matter came to light from the discussion on Pantapari; The owner killed the driver and buried the body!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मालकाकडून उसनवारीवर घेतलेले पैसे परत करीत नव्हता आणि कामावरही येत नव्हता. यातून मालक व ड्रायव्हर यात तणाव निर्माण झाला. यातूनच मालकाने इतरांच्या मदतीने आपल्या ड्रायव्हरचा खून करून त्याच्या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला जंगलात पुरले. ही घटना बुधवारी (दि. २) उघडकीस आली. पानटपरीवर सुरू असलेल्या चर्चेवरून हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. शांतनू अरविंद पशिने (३६, रा. मोहगाव, गंगेरुवा, जि. शिवनी-मध्य प्रदेश), असे ठार मारण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातील गौतम नगर परिसरातील आरोपी विक्रम उर्फ विक्की पवन सिंग बैस (३६) याच्या घरी कार चालविण्यासाठी शांतनू अरविंद पशिने हा कामावर होता. त्याने मालकाकडून ८० हजार रुपये उसनवारीवर घेतले होते. ते पैसे परत करीत नव्हता आणि कामावरही येत नव्हता. त्यामुळे विक्रम व शांतनू यांच्यात वाद झाला. या वादातून शांतनू पशिने याला काठ्यांनी मारून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिस निरीक्षक किशोर पर्वते हे स्वतः फिर्यादी झाले व त्यांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद केला.
तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम करीत आहेत. या गुन्ह्याची उकल पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार पर्वते, सहायक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम, धीरज राजुरकर, पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, अक्षय चन्नावार, घनश्याम थेर, अंमलदार कवलपालसिंह भाटीया, शेख, भेंडारकर, टेंभरे, बिसेन, चौहान, निशीकांत लॉदासे, सोनवाने, इंदुरकर, रावते, बारेवार, बिसेन, लांजेवार यांनी केली आहे.
जंगलात मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा मानस
गौतमनगर परिसरात ६ ते ७ लोकांनी मिळून एका व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत जंगलात जमिनीत पुरले आहे, अशी चर्चा ३० सप्टेंबर २०२४ रोजी गौत मनगर येथील पान टपरीवर सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकताच ती माहिती त्याने पोलिस उपनिरीक्षक थेर यांच्या मार्फत ठाणेदार पर्वते यांना दिली. यावर ठाणेदार पर्वते व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. गौतमन- गरच्या भागात झुडपी जंगल असल्याने व जंगली जनावर असल्याने प्रेत दफन केलेल्या जागेचा शोध घेणे शक्य होत नव्हते. यावर पर्वते यांनी २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गौतमनगर परिसरातील दक्षिण दिशेला असलेल्या स्मशान भूमीमधील झुडपी जंगल पिंजून काढले. यामध्ये त्यांना मृतदेह ज्या ठिकाणी खड्यात पुरून ठेवला होता, त्याचा शोध घेऊन मृतदेह दंडाधिकारी यांच्या समक्ष सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून खड्याबाहेर काढला. मृतदेह झुडपी जंगलात पाच फूट खोल खड्डा खोदून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने जमिनीत पुरून ठेवला होता.
घराला कुलूप लाऊन पसार झाल्याने संशय बळावला
मृतदेह काडल्यानंतर तो विक्रम बैस याचा ड्रायव्हर शांतनू पशिने याचा असल्याचे नागरिकांनी ओळखले. त्यानंतर पोलिसांनी विक्रम बैंस याच्याकडे चौकशी केली असता, तो सुरुवातीला पोलिसांना मिळाला. नंतर आपल्या परिवारासोबत घराला कुलूप लावून फरार झाला. यातून पोलिसांचा संशय बळावला. खुनासंबंधी संशयावरून विक्रम बैस याचा मित्र विकास ओमप्रकाश गजभिये याला पकडले असता, त्याने शांतनू पशिने याच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगून त्या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.