पुढील आठवड्यात जिल्ह्यात तापमानात होणार वाढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:20 IST2025-01-13T15:19:32+5:302025-01-13T15:20:19+5:30

थंडीचा जोर ओसरणार : हवामान खात्याचा अंदाज

Temperatures will rise in the district next week! | पुढील आठवड्यात जिल्ह्यात तापमानात होणार वाढ !

Temperatures will rise in the district next week!

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
गेल्या आठवडाभरापासून पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमानात मोठी घसरण झाल्याने थंडीपासून बचावासाठी लोक शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहेत. आता पुढील आठवड्यापासून तापमानात वाढ होणार असून, उत्तरोत्तर थंडीचा जोर ओसरणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजातून स्पष्ट होत आहे. राज्यात ३ जानेवारीपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्ह्यातही अशीच स्थिती असून, गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पुन्हा गारठा वाढला आहे. शनिवारी जिल्ह्याचे किमान तापमान ११.३ अंशापर्यंत घसरले होते. थंडीचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता पुढील आठवड्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील किमान आणि कमाल तापमानातही काहीशी वाढ होणार आहे. 


दिवसा जाणवणार उन्हाचा कडाका !
मागील काही दिवसांपासून वाढलेला थंडीचा कडाका शनिवारपर्यंत कायमच होता. आता पुढे मात्र तापमानात वाढ होणार आहे. जिल्ह्यात रविवारपासून आठवडा अखेर किमान तापमान १५ अंश, तर कमाल तापमान २९ अंशांपर्यंत पोहोचणार आहे. अर्थात दिवसा उन्हाचा कडाका जाणवणार आहे.


तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ ! 
जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी किमान तापमान ११ अंशांपर्यंत, तर शनिवारी ११.३ अंशांपर्यंत होते. 
रविवारपासून किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे. जिल्ह्यात तापमानात उत्तरोत्तर वाढच होणार असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे.


मकरसंक्रांतीनंतर सूर्य तळपणार ! 
सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असून, मकर- संक्रांत आता अवघ्या एका दिवसावर आली आहे. म्हणजेच आता उत्तरोत्तर दिवस मोठा आणि रात्री लहान असल्याचे जाणवणार आहे. अशात आठवडा अखेरपासून एकूण तापमानात वाढ होऊन सूर्य चांगलाच तळपणार आहे.


 

Web Title: Temperatures will rise in the district next week!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.