राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड, आमदार पुत्राचा १५ नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश
By अंकुश गुंडावार | Updated: May 26, 2023 13:07 IST2023-05-26T13:06:08+5:302023-05-26T13:07:29+5:30
जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात भुकंप

राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड, आमदार पुत्राचा १५ नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश
अर्जुनी मोरगाव ( गोंदिया) : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉ. सुगत यांनी सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगावच्या १५ नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी साडे अकरा वाजताचे सुमारास हा प्रवेश झाल्याची माहिती आहे.
डॉ. सुगत चंद्रिकापुरे हे भाजपत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. मात्र त्यांनी शिवसेना शिंदे गटात समर्थक नगरसेवकांसह प्रवेश केल्याची माहिती आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते नगरसेवकांच्या संपर्कात होते. अनेक ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढविल्या होत्या. एवढ्या लवकर ते पक्ष सोडतील असे वाटले नव्हते. मात्र गुरुवारी विमानाने नगरसेवकांना घेऊन ते मुंबईला पोहोचले. मुख्यमंत्र्यांशी बोलणी केली व पक्षप्रवेश करून घेतला. यात सडक अर्जुनी नगरपंचायतचे १२ व अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे ३ असे नगरसेवक असल्याचे समजते. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागले नाही. येणाऱ्या काळात आणखी किती कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करतात ते लवकरच कळेल.