मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे रेल्वे विभागाला बसतो मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:37 IST2025-01-13T17:34:33+5:302025-01-13T17:37:43+5:30
१२५ पशुपालकांवर कारवाई : रेल्वेने अवलंबिले कडक धोरण

Railways suffers a major blow due to stray animal nuisance
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मोकाट जनावरांमुळे रेल्वे सेवा प्रभावित होऊन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने कठोर धोरण अवलंबिले असून, जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत १२५ पशुपालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोकाट आणि भटक्या जनावरांमुळे रुळांवर रेल्वे वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे रुळांलगतची गावे, वस्त्या आणि इतर बाधित भागात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मेन रन ओव्हर आणि कॅटल रन कॉमन ओव्हरच्या घटनांना आळा बसेल, असा त्यामागील उद्देश आहे. रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या सर्व भागांत पशुपालकांच्या ठिकाणांची माहिती घेऊन यादी तयार करण्यात येत आहे. रेल्वे मार्गावर रूळावर आढळणाऱ्या जनावरांच्या मालकांची माहिती घेण्याचेही काम सुरू आहे. यापूर्वी रेल्वे मार्गावर चरणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करीत १२५ जणांवर रेल्वे कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे रुळावर गुरे येऊ न देण्याबरोबरच ग्रामपंचायत सरपंच व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे परिसरात अनधिकृतपणे प्रवेश करण्याबाबत ग्रामस्थांना जागरूक करण्यासाठी जाहीर दवंडी दिली जात आहे.
रेल्वेगाड्यांत वाढली सुविधा
रेल्वे प्रवाशांची सोय आणि मागणी लक्षात घेऊन सिकंदराबाद-रक्सौल- सिकंदराबाद या साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांकाची गाडी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेवरून २ जानेवारीपर्यंत धावणार होती. मात्र, आता ३ एप्रिलपर्यंत कालावधी वाढविण्यात आला आहे. ही ट्रेन सिकंदराबाद रक्सौल साप्ताहिक स्पेशल ट्रेन ३१ मार्चपर्यंत, दर सोमवारी सिकंदराबादहून धावेल. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेनेदेखील रक्सौल- सिकंदराबाद साप्ताहिक विशेष ट्रेन रक्सौल येथून ३ एप्रिलपर्यंत दर गुरुवारी धावेल. या ट्रेनमध्ये १ एसी-३, २ एसी टू- टायर, १ एसी फर्स्ट कम एसी टू-टायर, १२ स्लीपर, ४ जनरल आणि दोन एसएलआर, असे एकूण २२ डबे असतील.