आता प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर 'एसी वेटिंग रूम'; २७ जानेवारीपासून सुरू झाली सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:27 IST2025-01-31T16:26:07+5:302025-01-31T16:27:30+5:30
तासाभराचे मोजावे लागणार २० रुपये : गोंदिया रेल्वे स्थानकावर सुविधा

Now 'AC waiting room' at railway station for passengers; Service started from 27th January
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रवाशांसाठी नवीन आणि आधुनिक उपक्रम म्हणून गोंदियारेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. १ वर २७ जानेवारीपासून सशुल्क एसी प्रतीक्षालय सुरू करण्यात आले आहे. जुन्या प्रतीक्षालयाचे पूर्णपणे नूतनीकरण करून त्या जागी आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
विभागांतर्गत येणाऱ्या गोंदिया स्थानकात प्रथमच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश सर्व वर्गातील प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित वातावरण प्रदान करणे, हा आहे. प्रवाशांच्या आरामाची विशेष काळजी घेत प्रतीक्षालयात आरामदायी सोफे बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांना आपला वेळ अधिक चांगल्या पद्धतीने घालविता यावा, यासाठी प्रतीक्षालयात टीव्ही व इतर मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवाशांची सोय लक्षात घेता नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वेटिंग रूममध्ये उच्च दर्जाचे आणि स्वच्छ स्वच्छतागृह आणि वॉशरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सोयीसाठी वेटिंग रूममध्ये स्वतंत्र बाळ काळजी कक्ष उपलब्ध आहे.
प्रवास होणार आरामदायक
ही सेवा प्रत्येक प्रवाशाची गरज पूर्ण करेल आणि त्यांचा प्रवास अधिक आरामदायक होईल, याची रेल्वे प्रशासनाने खात्री केली आहे. विभागातील इतर रेल्वेस्थानकांवरही अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून प्रत्येक श्रेणीतील प्रवाशांना या स्थानकांवर त्याचा लाभ मिळू शकेल. सोबतच रेल्वेचा महसूल वाढून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील आणि आर्थिक विकास होऊ शकेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.