दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 15:54 IST2022-03-19T15:37:26+5:302022-03-19T15:54:20+5:30
८० किलो गांजा दुचाकीवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल ८०० किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली.

दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले
गोंदिया : चक्क दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. या गांजाची किंमत १२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. गोंदियामार्गे छत्तीसगडमधून उत्तर प्रदेशात या गांजाची तस्करी केली जात होती.
गौतम नरेश चौहान असे या तरुणाचे नाव आहे. गांजाच्या तस्करीसाठी तो तब्बल ८०० किमी अंतर दुचाकीवरून पार करणार होता. गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमा आहेत. या मार्गावर अनेक नागरिक जा-ये करत असतात. होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने पोलीस विभाग सतर्क होते. यावेळी एका दुचाकीवर तरुण संशयितरीत्या आढळला असता सालेकसा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.
सालेकसा-आमगाव मार्गावरील झालिया गावाजवळ अडवत त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ८० किलो गांजा आढळला. हा गांजा छत्तीसगड राज्याच्या जगदलपूरवरुन उत्तर प्रदेशातील नोएडा इथे नेत असल्याचे त्याने सांगितले . ८० किलो गांजा दुचाकीवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल ८०० किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान गांजाचे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गांजाची बाजार किंमत १२ लाख रुपये असून त्याच्याकडून मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. गांजाची तस्करीबाबत सालेकसा पोलीस पुढील तपास करत आहेत.