महाविकास आघाडीचा जिल्ह्यात तीन एकचा फार्म्युला निश्चित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:55 IST2024-10-25T16:54:33+5:302024-10-25T16:55:37+5:30
रविकांत बोपचे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी : काँग्रेसच्या पहिल्या यादीत कपालदास पवायचे नाव

Mahavikas Aghadi's three-one formula in the district is fixed!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील चार जागांचा फार्म्युला निश्चित झाला आहे. चारपैकी तीन जागा काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गेली आहे. गुरुवारी (दि.२४) काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यात तिरोडा मतदारसंघातून रविकांत बोपचे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
तिरोडा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुरुवातीपासूनच दावा केला होता. मात्र मध्यंतरी ही जागा काँग्रेसकडे जाणार व अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार अशी चर्चा होती. पण या चर्चेला गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीनंतर पूर्णपणे ब्रेक लागला आहे. आता गोंदिया, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा तीन एकचा फार्म्युला निश्चित झाला आहे.
गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी निश्चित झाली. याची अधिकृत घोषणा गुरुवारी झाली. तर आमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील नावे उमेदवारांची नावे निश्चित झाली असली तरी त्यावर चर्चा करणे सध्या टाळले जात आहे. शुक्रवारी यादी जाहीर झाल्यावरच कळेल असे काँग्रेसचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते सांगत आहे. यादीत अपेक्षित नावे असणार की नवीन याला घेऊन सस्पेन्स कायम आहे.
इच्छुकांची धाकधूक कायम
अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर आमगावमध्ये खासदार व आमदार यांच्यातील वादाचे पडसाद उमेदवारी यादीवर उमटण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यातच आता या दोन्ही मतदारसंघाचा काँग्रेसच्या पहिल्या यादीत समावेश नसल्याने इच्छुकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.
तिरोड्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना
महायुतीकडून या मतदारसंघातून भाजपचे आ. विजय रहांगडाले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण महाविकास आघाडीकडून उमेदवार ठरला नव्हता. पण गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या मतदारसं- घातून रविकांत बोपचे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या आता मत- दारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे. तर या मतदारसंघात कोण अपक्ष उमेदवार राहतो याकडे नजरा लागल्या आहे. या मतदारसंघात उमेदवाराच्या विजयात नेहमीच अपक्ष उमेदवाराची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
आमगाव, अर्जुनी मोरगावचा सस्पेन्स कायमच
काँग्रेस गुरुवारी रात्री उशीरा ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली. पण आमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील उमेदवारांचा त्यात समावेश नसल्याने या जांगावरील सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अपेक्षित चेहऱ्यांना संधी मिळणार की यात काही बदल होणार याला घेवून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात अग्रवाल विरुध्द अग्रवाल सामना निश्चित झाला आहे.