महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास होणार १ जूनपासून अधिक आरामदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:52 IST2025-03-29T17:21:19+5:302025-03-29T18:52:15+5:30

गाडीचे डबे वाढणार : रेल्वे विभागाची माहिती

Maharashtra Express journey will be more comfortable from June 1 | महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास होणार १ जूनपासून अधिक आरामदायी

Maharashtra Express journey will be more comfortable from June 1

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, यासाठी रेल्वे विभागाने पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ही १ जूनपासून नव्या रूपात धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही आनंददायी बाब ठरणार आहे.


मध्य रेल्वे प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत गाड्यांमधील जुने रॅक आधुनिक लिंक हाफमन बुश डब्यांमध्ये रूपांतरित केले जात आहेत. याच अंतर्गत गोंदियाहून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे देखील एक एलएचबी कोचमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. या गाडीत १ द्वितीय वातानुकूलित कोच, ४ तृतीय वातानुकूलित कोच, ७स्लीपर कोच, ४ सामान्य द्वितीय श्रेणी कोच, १ सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि १ जनरेटर कार असेल. या बदलामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सोयिस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल. कोल्हापूर-गोंदिया एक्सप्रेस कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून १ जून २०२५ पासून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावेल. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस ३ जूनपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावेल.


तृतीयपंथीयांवर कारवाई
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक दिलीप सिंग आणि विभागीय सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली, रेल्वे संरक्षण दल आणि वाणिज्य विभागाचे अधिकारी, टीटीई कर्मचारी यांची संयुक्त टीम तयार केली आहे. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आणि ट्रेनमध्ये प्रवाशांना अश्लील चाळे करून त्रास देणाऱ्या आणि पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली.


'एमएसटी' धारकांसाठी तीन कोचमध्ये सुविधा
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये केलेले बदल लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी, सक्षम प्राधिकरणाने गोंदिया-नागपूर विभागात मासिक पासधारक, अर्धवार्षिक पासधारक तिकीटधारकांसाठी ३ विशेष स्लीपर कोच एस ५, एस ६ आणि एस ७ या कोचमधून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा गोंदियातून ३ जूनपासून लागू होईल. मासिक पासधारक, अर्धवार्षिक पासधारक तिकीट धारकांना प्रवास करताना गैरसोयीचा सामना करावा लागू नये. एसपीसी नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी ही माहिती दिली.

Web Title: Maharashtra Express journey will be more comfortable from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.