शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवणे ठरू शकते धोकादायक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:23 IST2025-04-02T17:22:20+5:302025-04-02T17:23:07+5:30
हृदयरोगतज्ज्ञ : पेसमेकरच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

Keeping a mobile phone in the left pocket of your shirt can be dangerous!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हृदयाच्या असामान्य लयवर (ॲरिथमिया) उपचार करण्यासाठी, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकर लावलेल्या व्यक्तीने शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवू नये, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे. मोबाइलच्या गरजेचे रूपांतर आता व्यसनात होऊ लागले आहे. सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाइल हा विविध आजारांसाठी कारणीभूत ठरत आहे. बहुसंख्य लोकांना मोबाइलमुळे मानसिक आजाराकडे घेऊन जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मोबाइलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थता वाटणे, मोबाइल वाजल्याचा सतत भास होणे, मोबाइलवर सतत गेम खेळणे, सेल्फी घेण्याचा नाद निर्माण होणे, मोबाइल हातात नसताना बोटांच्या हालचाली होणे, ही मोबाइलच्या आजाराची लक्षणे आहेत. स्मार्टफोनचा अति वापर हा मानसिक आजार आहे.
हृदयाच्या असामान्य गतीवर पेसमेकरची मदत
हृदयाची गती मंदावली आहे किंवा त्याचे ठोके चुकले आहेत, तर ते हृदयाला त्याच्या सामान्य गतीवर परत आणण्यासाठी पेसमेकर मदत करतो. कॉलरबोनच्या अगदी खाली त्वचेखाली तो घातला जातो. त्यामुळे पेसमेकर बसविलेल्या रुग्णांना शर्टाच्या डाव्या बाजूच्या खिशात मोबाइल न ठेवण्याचा सल्ला अनेक हृदयरोगतज्ज्ञ देताना दिसून येतात.
ठोस पुरावा नाही
मोबाइल फोन शर्टाच्या डाव्या खिशात ठेवण्याचा आणि हृदयविकाराचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. सध्या अत्याधुनिक पेसमेकर आले आहे. मोबाइलचा त्याच्यावर फारसा प्रभाव पडत नाही. परंतु तरीही काळजी म्हणून हृदयाजवळ मोबाइल ठेवणे टाळायला हवे, असेही हृदयरोगतज्ज्ञ सांगत आहेत.