गोरेगावात थरकाप उडवणारा खून ! जादूटोण्याच्या संशयावरून शेतकऱ्याचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:11 IST2025-06-19T13:10:46+5:302025-06-19T13:11:08+5:30
Gondia : लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर घातला होता वार

Horrifying murder in Goregaon! Farmer murdered on suspicion of witchcraft
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील हेटीटोला येथील शेतकरी आसाराम देऊ कांबळे (५५) यांच्यावर आरोपी जादूटोण्याच्या संशय घेऊन त्यांचा निघृण खून करण्यात आला. ही घटना १७ जून रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ६:३० वाजता घडली. आसाराम कांबळे हे शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. संध्याकाळी शेळ्या परत आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता जंगलातील तलावाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणात आरोपी देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (२४) रा. हेटी, (सध्या मूळगाव हैद्राबाद) याला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात अवघ्या काही तासांत आरोपी देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम याला हलबीटोला येथून अटक करण्यात आली.
गोरेगाव पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद केला होता. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजुरकर, पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, विठ्ठल ठाकरे, दीक्षितकुमार दमाहे, प्रकाश गायधने, इंद्रजित व सुबोध बिसेन, हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर, सुनील डहाके, योगेश रहिले, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, राम खंडारे यांनी केली आहे.
खून करण्यासाठी तो आला हैदराबादवरून
मृतकाने जादूटोना केल्याच्या संशयावरून आसाराम यांचा खून करण्यासाठी आरोपी देवेंद्र उर्फ भुरू हा हैद्राबादवरून मुद्दाम गावी आला. यानंतर त्यांने जंगलात आसारामच्या डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. घटनेनंतर तो परत हैद्राबादला जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
तपासासाठी तीन चमू केल्या होत्या गठित
पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, अंमलदार यांची ३ पथके नेमण्यात आली होती. पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीची माहिती घेत त्याच्या नातेवाईकाचे घर गाठले. तिथे आरोपी आढळला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांने खून केल्याची कबुली दिली.