गोंदिया जिल्ह्याला मिळाल्या तीन नवीन रेल्वे गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:21 IST2025-05-31T17:20:38+5:302025-05-31T17:21:02+5:30
प्रवाशांना मिळाला दिलासा : अनेक वर्षांपासून होती प्रतीक्षा

Gondia district gets three new railway trains
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :रेल्वे बोर्डाने गुरुवारी (दि.२९) रिवा-पुणे, जबलपूर-रायपूर, ग्वालियर-बंगळूर या तीन रेल्वे गाड्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांना या तीन नवीन गाड्यांची भेट मिळाली आहे. रिवा-पुणे आणि जबलपूर-रायपूर या मार्गावरील रेल्वे गाड्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती. ती रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव या मार्गी लावल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
रिवा-पुणे ही गाडी व्हाया नैनपूर, बालाघाट, गोंदिया, डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, भिलाई व जबलपूर रायपूर ही गाडी सताना, जबलपूर, नैनपूर, बालाघाट, गोंदिया, नागपूर जाणार आहे. शिवाय ग्वालीयर-बंगळूर या गाडीचा सुध्दा गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होणार आहे. रेल्वे बोर्डाने या तिन्ही गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने हिरवी झेंडी दिली आहे. तर येत्या तीन चार दिवसात या गाड्यांचे वेळापत्रक सुद्धा जाहीर होणार असल्याची माहिती आहे. या तिन्ही गाड्यांचा लाभ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यातील प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
व्यापार व पर्यटनाला मिळेल चालना
या रेल्वे गाड्या सुरू झाल्याने या तिन्ही राज्यातील व्यापाराला चालना मिळण्यास मदत होणार आहे. रेल्वे गाड्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कान्हा केसरी राष्ट्रीय उद्यान, उज्जैन, भोपाळ, अमरकंटक, ग्वालियर, ओंकारेश्वर या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना मदत होणार असल्याने पर्यटनाला सुद्धा या माध्यमातून चालना मिळणार आहे.
अनेक वर्षांपासून मागणी झाली पूर्ण
जबलपूर-रायपूर व रिवा-पुणे या मार्गावर रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात यासाठी अनेक वर्षांपासून रेल्वे मंत्रालय आणि बोर्डाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर रेल्वे मंत्र्यांनी त्याची दखल घेत त्याला मंजुरी दिल्याने अनेक वर्षांपासून प्रतीक्षा संपली असून प्रवाशांना सुद्धा दिलासा मिळाला असल्याचे बालाघाट शिवणी लोकसभा क्षेत्राच्च्या खा. भारती पारधी यांनी सांगितले.