ताई, सोने-चांदीचे भाव उतरले, बनवा आता दागिने !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:32 IST2024-07-26T13:30:29+5:302024-07-26T13:32:11+5:30
गोंदिया शहरात सोन्याचे दर ७०,४०० प्रतिग्रॅम : आयात शुल्कात कपातीने दिलासा

Gold and silver prices have come down, make jewelry now!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मार्च महिन्यापासून तेजीत असलेल्या सोने-चांदीचे दर अखेर आयात शुल्क कमी केल्यानंतर २५ जुलैला घसरले. गत १० दिवसांच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याचे भाव जवळपास तीन हजारांनी कमी झाल्याने, दागिने बनविणे सोपे झाले आहे.
२०२४ मध्ये जानेवारी महिन्यापासून गोंदियाच्या बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होता. मार्च महिन्यापासून मात्र सातत्याने तेजी होती. सोने, चांदीच्या दराने एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली होती. मे व जून महिन्यातही सोने-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. सोन्यापेक्षा चांदीच्या दरात अधिकच वाढ असल्याचे पाहावयास मिळाले होते. पावसाळ्याच्या दिवसांत सोने-चांदी खरेदी-विक्रीसाठी 'स्लॅक सिझन' मानले जात असले तरी यंदा मात्र २२ जुलैपर्यंत सराफा बाजार तेजीतच होता. २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या आयात शुल्कात कपात केल्याने दुपारनंतर भाव गडगडले. २५ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव ७०,४०० रुपये, तर चांदीचा प्रतिकिलो भाव ८६ हजार रुपये होते. यामध्ये तीन टक्के जीएसटीचा समावेश नाही. आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने गत पाच महिन्यांत प्रथमच सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.
असे राहिले चढ-उतार !
जानेवारी २०२३ मध्ये सोन्याला प्रतितोळा सरासरी ५६ हजार रुपये दर होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रतितोळा ६२ हजार ९०० रुपये भाव होते. २० एप्रिल रोजी ७४ हजार रुपये, मे महिन्यात ७२,३००, जून महिन्यात ७२,००० रुपये प्रतितोळा भाव होता. १३ जुलै रोजी ७२,८०० रुपये तर २५ जुलै रोजी ६९,६०० रुपये भाव होता.
दहा दिवसांत चांदी ९ हजाराने उतरली
मार्च ते १३ जुलै २०२४ या कालावधीत चांदीच्या दरात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले. २० एप्रिल रोजी चांदीला प्रतिकिलो ८४ हजार रुपये भाव होता. मध्यंतरी तर चांदीने ९५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. १३ जुलै रोजी ९३ हजार रुपये भाव होता. गत दहा दिवसांत ९ हजार रुपयाने घसरण झाली असून, २५ जुलै रोजी गोंदियाच्या सराफा बाजारात चांदीला प्रतिकिलो ८६ हजार रुपये भाव होता.
महिना निहाय सोन्याला किती भाव (२०२४)
जानेवारी - ६१,१००
फेब्रुवारी - ६२,९००
मार्च - ६९,८००
एप्रिल - ७४,०००
मे - ७२,०००
जून - ७२,०००
जुलै महिन्यात सोन्याचे भाव
१३ जुलै - ७२,८००
२१ जुलै - ७३,३००
२५ जुलै - ७०,४००
"गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय, अमेरिकेवरील वाढत चाललेला कर्जाचा बोझा, भारतीयांना असलेले दागिन्यांचे आकर्षण यांसह अन्य कारणांमुळे मार्च ते २२ जुलै या कालावधीत सोने-चांदीच्या दरात तेजी असल्याचे पाहावयास मिळाले. आता भावात घसरण झाली."
- सचिन बरबटे, सराफा व्यावसायिक