अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; खोबा हलबीटोला येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 17:30 IST2022-09-08T17:29:06+5:302022-09-08T17:30:57+5:30
जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरु

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; खोबा हलबीटोला येथील घटना
गोंदिया : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा हलबी येथे गुरुवारी (दि.८) सकाळच्या सुमारास घडली. रामेश्वर रतिराम मडावी (५२) असे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र सहाय्यक नरेंद्र वाढई, वनरक्षक हिना राऊत, वनरक्षक पुरुषोत्तम पटले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी रामेश्वरला नवेगावबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात रेफर केले.
खोबा परिसर नवेगावबांध अभयारण्याला लागून असल्याने या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. रामेश्वर मडावी हे गुरुवारी सकाळी शेतात काम करित असताना दबा धरुन बसलेल्या अस्वलाने त्यांच्या हल्ला करुन गंभीर जखमी केले. मागील काही दिवसांपासून या परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, पांढरी, शेंडा, खोबा, रेंगेपार परिसरात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. रामेश्वर हे अल्पभूधारक गरीब शेतकरी असून शासनाने त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रामेश्वरला वनविभागाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाईल. पहाटेच्या वेळी व रात्री शेतकऱ्यांनी एकटे शेतावर काम करण्यासाठी जावू नये.
- सुरेश जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी