मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू
By अंकुश गुंडावार | Updated: July 10, 2023 17:54 IST2023-07-10T17:54:19+5:302023-07-10T17:54:34+5:30
बिरसोला येथील घटना : मागील महिन्यात तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता.

मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू
रावणवाडी (गोंदिया) : घरगुती विहिरीतील बंद पडलेल्या मोटारपंप दुरुस्तीसाठी बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याचा विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१०) गोंदिया तालुक्यातील बिरसोला काटी येथे घडली. सनत बुधेलाल नागफासे (४७) रा. बिरसोला काटी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील महिन्यात तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना गोंदिया तालुक्यातील बिरसोला काटी येथे सुद्धा सोमवारी अशीच घटना घडली. प्राप्त माहितीनुसार बिरसोला काटी येथील सनथ नागफासे यांच्या घरासमोर घरगुती विहीर आहे. घरगुती पाण्याचा वापर करण्यासाठी त्यांनी विहिरीत मोटारपंप लावला आहे. मात्र सोमवारी हा मोटारपंप बंद पडला. त्यामुळे सनथ नागफासे हे मोटारपंप दुरुस्ती करण्यासाठी विहिरीतून तो बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र विहिरीत उतरताच विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे त्यांचा विहिरीत गुदमरुन मृत्यू झाला.
दरम्यान कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आजबाजुच्या शेजाऱ्यांना बोलावून मदत कार्य सुरु केले. पण विहिरीत विषारी वायू असल्याची शंका आल्याने कुणीही विहिरीत न उतरले नाही. या घटनेची माहिती पोलिस स्टेशन व आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान विहिरीतून मृतक शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विहिरीतील विषारी वायू गळतीमुळेच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा अंदाच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे. रावणवाडी पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली आहे.